साडेसात कोटींचे सोने जप्त

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर खऱया अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल, परंतु त्याआधीच राज्यभरात बेकायदेशीर कोटय़वधी रुपये मिळत आहेत. या पैशांसोबतच आता तासवडे टोल नाक्यावर निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणीदरम्यान सोन्या-चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या सोन्या-चांदीची किंमत तब्बल 7 कोटी 53 लाख रुपये इतकी आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

कराड ते सातारा जाणाऱया रस्त्यावरील तासवडे टोल नाक्यावर एमएच 12 व्हीएफ 3937 क्रमांकाची कुरिअर वाहतूक करणारी गाडी अडवण्यात आली. वाहनाच्या इनव्हाईसची तपासणी केल्यावर त्यात सोन्या-चांदीचे दागिने आढळले. ही कारवाई एफएसटी पथक, जीएसटी अधिकारी, आयकर अधिकारी, कराड तहसीलदार आणि कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली. तपासणीमध्ये 9 किलो 390 ग्रॅम सोने आणि 60 किलो चांदी असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या सोन्या-चांदीची अंदाजे किंमत 7 कोटी 53 लाख रुपये असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सध्या आयकर विभागाकडून इनव्हाईस पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली सुरक्षितपणे वाहनात ठेवलेले आहेत.