
अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणाचा गौतम अदानींच्या उद्योग समूहाला जोरदार झटका बसला आहे. मूडीज रेटिंग्सने अदानी समूहाच्या तब्बल सात कंपन्यांचे स्थिर हे स्टेटस बदलून त्यांना लाल शेरा दिला आहे. त्यामुळे अदानींचा उद्योग आणखी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि अदानी ग्रीन तसेच पोर्ट्ससह महत्त्वाच्या सात कंपन्यांचा समावेश आहे.
मूडीज रेटिंग्सने दिलेल्या लाल शेऱयात अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे प्रत्येकी दोन युनिट, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड तसेच अदानी इंटरनॅशनल पंटेनर टर्मिनल यांचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या फेडरल कोर्टात लाचखोरीचा खटला दाखल करण्यात आला आहे. गौतम अदानी यांनी सौर ऊर्जेचे पंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱयांना 2 हजार 200 कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप आहे. अमेरिकेतील वकिलांनी दूतावासामार्फत गौतम अदानी, त्यांचा पुतण्या यांच्यासह सहा जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींनीही अमेरिकेत वेग घेतला आहे.
शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले
लाचखोरीच्या आरोपांनतर अदानींच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स 7.05 टक्क्यांनी घसरून शेअर्सची किंमत 899.40 रुपये इतकी झाली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 4.78 टक्केच राहिले. शेअर्सची किंमत 2,149.80 रुपये होती तर अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 3.79 टक्क्यांनी घसरून त्याची किंमत 601.15 रुपये इतकी झाली. तर अदानी टोटल गॅस लिमिटेडचे शेअर्स 3.50 टक्के, अदानी पोर्ट्स 3.23 टक्क्यांनी, विल्मर 2.44 टक्के, अंबुजा सिमेंट 2.30 टक्के, अदानी पॉवर 2.04 टक्के, एनडीटीव्ही 0.08 टक्क्यांनी घसरले.
भागीदार कंपन्यांनी बदलला विचार
अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड आणि विल्मर इंटरनॅशनल लिमिटेड आपल्या ज्वाइंट व्हेंचर म्हणजेच अदानी विल्मरमध्ये कमीत कमी 12 टक्क्यांच्या प्रस्तावित विक्रीत उशीर करण्यावर विचार करत आहे. अदानी विल्मरसाठी अदानी समूह आणि सिंगापूरमधील कमोडिटी पंपनी विल्मर यांच्यात करार झाला आहे. ही कंपनी 2022 मध्ये हिंदुस्थानातील शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. सेबीच्या नियमांनुसार कंपनीला सूचीबद्ध केल्याच्या तीन वर्षांनंतर कमीत कमी 25 टक्के समभाग विकावे लागतात. अदानी विल्मर सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीला फेब्रुवारी 2025 मध्ये तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अदानी यांच्यावर झालेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे फेब्रुवारीपूर्वी कंपनीला समभाग विकणे कठीण होणार असल्याचे चित्र आहे.
निधीची कमतरता भासणार
अदानींवर झालेल्या आरोपांमुळे त्यांच्या पंपन्यांना भविष्यात कमी गुंतवणुकीमुळे निधीची कमतरता भासू शकते. त्यामुळे गुंतवणूक खर्च वाढण्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे. मूडीजने अदानी ग्रीनला बीए 1 रेटिंग तर अदानी ट्रान्समिशन, अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी पोर्ट्स आणि अदानी इंटरनॅशनल पंटेनर टर्मिनलला बीएए 3 रेटिंग दिली आहे.