
महिलांवर वाढते अत्याचार लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात महिलांना त्यांच्या तक्रारी स्वतंत्रपणे मांडता याव्यात यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबईतील महिलेवर शीळ येथे झालेला अत्याचार आणि उरण येथील एका मुलीची झालेली हत्या, अशी प्रकरणे गंभीर असल्याची भावना सामान्य जनतेत आहेत. या प्रकरणांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून नुकत्याच घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत समाजामध्ये संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर दिघे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे, अशी मागणी केली आहे. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाल्यास महिलांना त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्यांच्या तक्रारी मांडता येतील व निसंकोचपणे महिला त्यांच्या समस्यांबाबत न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात जातील. तसेच महिलांविषयीचे प्रश्न महिला पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जलद गतीने सोडवण्यास मदत होईल, असेही केदार दिघे यांनी यावेळी सांगितले.