सत्र न्यायालयाचा ईडीला झटका, अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला मुभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट दहा वर्षांसाठी नूतनीकरण करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली. देशमुख यांच्या अर्जाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तीव्र विरोध केला होता, मात्र हा विरोध धुडकावत विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांचा अर्ज मंजूर केला. तसेच देशमुख यांना परदेश प्रवासालाही मुभा दिली. त्यामुळे ईडीला मोठा झटका बसला आहे.

कथित खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्या जामिनाच्या अटीनुसार मुंबईबाहेर जाण्यासाठी देशमुख यांना न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार परदेशात जाण्यासाठी आणि पासपोर्ट दहा वर्षांकरिता नूतनीकरण करण्यासाठी देशमुख यांनी अॅड. इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यावर विशेष न्यायाधीश आदिती कदम यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी ईडीने देशमुख यांच्या अर्जावर तीव्र आक्षेप घेतला. पासपोर्ट नूतनीकरण केल्यास देशमुख देशाबाहेर पळून जाऊ शकतात, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.