
मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा शुक्रवार, 4 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. मात्र, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबईत 24 विभागांत ‘क्लीन अप मार्शल’कडून अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र, या क्लीन अप मार्शल आणि या संस्थांविरोधात तक्रारी आल्यानंतर या खासगी संस्थांच्या कंत्राटांना मुदतवाढ न देता त्यांची सेवा बंद करण्याचा कठोर निर्णय पालिकेने घेतला. दरम्यान, शुक्रवारनंतरही या ‘क्लीन अप मार्शल’कडून दंडात्मक कारवाई होत असल्यास रहिवाशांनी मुंबई महापालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
इथे करा तक्रार
‘क्लीन अप मार्शल’कडून दंड आकारणी होत असल्यास मुंबई महापालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाच्या 022 – 23855128 आणि 022 – 23877691 (विस्तारित क्रमांक 549/500) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पथकातील जागा रिक्त
पालिकेच्या उपद्रवमूलक पथकांमध्ये एकूण 118 जागा आहेत. या जागांपैकी 95 जागा रिक्त आहेत. त्यामुळे ज्या दक्षतेने क्लीन अप मार्शल कारवाई करायचे तशी कारवाई हे पथक करेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकरात लवकर या जागा भरल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.