सोमनाथ सूर्यवंशी हा दलित तरुण संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलनात उतरला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती खोटी असून पोलिसांनीच सूर्यवंशी याची हत्या केली. दलित आहे म्हणूनच त्याला संपवले, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी आज दुपारी परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, आपण सूर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन करून एकूण परिस्थितीची माहिती घेतली आहे. सूर्यवंशी याच्या हत्येस पोलीसच जबाबदार आहेत. सूर्यवंशी याचा शवविच्छेदन अहवाल स्पष्टच सांगतो आहे की, त्याचा मारहाणीतच मृत्यू झाला. मात्र सरकार पोलिसांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे हत्या करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे. मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधानविरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार आहोत. त्यातून निश्चितच सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, खासदार प्रणीती शिंदे, शिवसेना उपनेते, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, अमित देशमुख, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, विजय गव्हाणे, तुकाराम रेंगे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रवी सोनकांबळे, चंद्रकांत हांडोरे, नदीम इनामदार, अमोल जाधव, सुनील तुरुकमाने आदी उपस्थित होते.
सूर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन
परभणीत दाखल होताच राहुल गांधी यांचा ताफा नवा मोंढा भागातील स्व. सोमनाथ सूर्यवंशी याच्या निवासस्थानी दाखल झाला. गांधी यांनी स्व. सूर्यवंशी याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सूर्यवंशी याच्या कुटुंबातील सदस्यांकडून सरकारने केलेल्या अन्यायाबाबत माहिती घेतली. त्यानंतर आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, निश्चित न्याय मिळवून देऊ, असे आश्वासित केले.
वाकोडे यांच्याविषयी कारस्थान दुर्दैवी
राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील अग्रणी ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या राहुलनगरातील निवासस्थानी भेट देऊन वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर वाकोडे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान अमूल्य होते. जातीय सलोखा व शांततेसाठी वाकोडे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याऐवजी त्यांना आरोपी ठरविण्याचे राज्य सरकारचे कारस्थान दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
परभणी व बीडप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग प्रस्ताव आणणार
सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. बीड व परभणी प्रकारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती देऊन सदस्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.