राज्यात उद्या, 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मतदानांचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे. मराठी मालिकेतील कलाकारांना मतदान करता यावे, यासाठी अनेक मालिका निर्मात्यांनी कलाकारांना सुट्टी जाहीर केली आहे. काही मालिकांचे चित्रीकरण मुंबईबाहेर होत असल्यामुळे कलाकारांना आपापल्या ठिकाणी येऊन मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्यांना लागू आहे. सुट्टीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे.
या मालिकांना सुट्टी
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘उदे गं अंबे’, ‘अबोली’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘इंद्रायणी’, ‘पिंगा गं पोरी’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नवरी मिळे हिटरला’ अशा काही मालिकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर ‘गाथा नवनाथांची’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘शिवा’, ‘सावळ्यांची जणू सावली’ या मालिकांचे चित्रीकरण दुपारनंतर करण्यात येणार आहे.