नवी मुंबई विमानतळावर व्हीआयपींसाठी टर्मिनल, व्हीआयपी कल्चर मोडीत काढण्याच्या मोदींच्या धोरणाला धक्का

व्हीआयपी कल्चर मोडीत काढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाला त्यांच्या उद्योगपती मित्रानेच जोरदार धक्का दिला आहे. अदानी समूहाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीव्हीआयपींसाठी वेगळे प्रवेशद्वार तर बांधलेच, पण त्यांची विमाने उतरवण्यासाठी स्वतंत्र विशेष टर्मिनलही उभे करण्याचा घाट घातला आहे. या टर्मिनलचा वापर महत्त्वाचे राजकीय नेते, नामांकित चित्रपट अभिनेते, अब्जाधीश उद्योगपती आणि ज्यांच्या मालकीचे खासगी विमान आहे अशा व्यक्ती करू शकणार आहेत. व्हीव्हीआयपींसाठी उभ्या राहणाऱ्या या टर्मिनलचे बांधकाम पुढील वर्षी सुरू होणार असून 2030 मध्ये ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे मोदींनी केलेली व्हीआयपी कल्चर हद्दपार करण्याची घोषणा हा केवळ फार्सच ठरला आहे.

भाजपवर नेटकऱयांची टीकेची झोड

हिंदुस्थानमध्ये व्हीआयपी कल्चर हे इंग्रजांच्या राजवटीपासून सुरू झाले आहे. इंग्रज गेल्यानंतर हे कल्चर तसेच मागे राहिले आहे. त्यामुळे आता व्हीआयपी कल्चर घालवून देशात ईपीआय (एव्हरी पर्सन इंपोर्टंट) कल्चर आणू, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र पंतप्रधानांशी अत्यंत जवळचे संबंध असणाऱया अदानी समूहाकडून साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळावर थेट व्हीव्हीआयपी  टर्मिनल उभे केले जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजपच्या पॉलिसीवर आणि घोषणांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.