व्यापार युद्धाच्या धसक्यानं शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स 800, तर निफ्टी 180 अंकांनी कोसळला, मिनिटभरात लाखो कोटींचा चुराडा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरही 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. याचे थेट पडसाद शेअर बाजारावर उमटले आहे. गुरुवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स 800 अंक, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे निफ्टी 180 अंक कोसळला. यामुळे अवघ्या मिनिटभरामध्ये गुंतवणूकदारांच्या 1.93 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.

हे वाचा – ‘पंतप्रधान मोदी माझे मित्र, पण…’, आधी कौतुक, मग टोमणे मारत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लावला 26 टक्के टॅरिफ

बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स 1.05 टक्क्यांनी कोसळून 75,811.12 वर पोहोचला, तर निफ्टी-50 इंडेक्समध्ये 0.75 टक्के अर्थात 182 अंकांनी कोसळून 23, 150.30 वर वर पोहोचला. ऑटो सेक्टरमध्ये 1.25, आयटी सेक्टरमध्ये 1.67 टक्के आणि मेटल्स सेक्टरमध्ये 0.81 टक्के घसरण पहायला मिळाली. तर दुसरीकडे फार्मा सेक्टरमध्ये मात्र 2.95 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर लाल

सेन्सेक्सवर लिस्टेड 30 पैकी फक्त 6 शेअर ग्रीन असून इतर सर्व शेअरमध्ये घसरण दिसून आली. सनफार्माचा शेअर सर्वाधिक 5.24 टक्के वाढला असून सर्वाधिक घसरण एचसीएल टेकच्या शेअरमध्ये झाली आहे. हा शेअर 2.21 टक्क्यांनी खाली आला आहे. यासह झोमॅटो, टाटा स्टील, आयटीसी, एसबीआयएन, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टाटा मोटर्स, टीसीएसच्या शेअरमध्येही घसरण नोंदवलण्यात आली.

हिंदुस्थानवर 26 टक्के आयात शुल्क

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये बोलताना जगभरातील देशांवर किती टक्के टॅरिफ लावला याची माहिती दिली. हिंदुस्थान अमेरिकन उद्पादनांवर 52 टक्के आयात शुल्क लावतो, त्यामुळे अमेरिका हिंदुस्थानी मालावर निम्मा अर्थात 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. तर चिनी मालावर 34 टक्के, युरोपियन युनियवर 20 टक्के, जपानवर 24 टक्के, तैवानवर 22 टक्के आणि इस्रायलवर 17 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली.