68 वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे का? भुजबळांचा दादांना टोला

ajit-pawar-chhagan-bhujbal

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते प्रचंड नाराज असताना आपल्याला डावलण्यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याचे ओबीसी नेत्यांचे स्पष्ट मत असल्याचे खुद्द भुजबळ यांनीच सांगितले. ‘तरुणांना संधी देण्यासाठी वरिष्ठांना मंत्रिपद दिलं नसल्याचं अजित पवार यांनी एका मेळाव्यात सांगितले. मात्र तरुण म्हणजे किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचे? मग 67 ते 68 वर्षांपर्यंत तरुण म्हणायचे का?’, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

महायुती सरकारने नुकतीच मंत्रिपदाची यादी घोषित करताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्यांना डावलून धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिपदापासून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी आज पहिल्यांदाच राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. मला लोकसभा निवडणुकीचे तिकीट वेळेत दिले नाही म्हणून तेव्हा मी माघार घेतली. मात्र आता पुन्हा लोकसभेवर जाण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभेवेळीच मला आधी सांगितलं असतं की निवडणूक लढवू नका तर निवडणूक लढवलीही नसती,’ असा संतापही भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच पुढील भूमिका जाहीर करण्यास वेळ लागेल असेही ते म्हणाले.

डावलण्यामागे गौडबंगाल

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘ओबीसी नेत्यांनी मला सांगितले की असं कसं होऊ शकतं? तुम्ही ओबीसींचे नेतृत्व करता. ओबीसींच्या प्रश्नासाठी तुम्ही राज्यात आणि विधानसभेत प्रश्न मांडले. असे असताना आता तुम्हाला मंत्रिमंडळाबाहेर ठेवले. याचा अर्थ याच्या मागे काहीतरी गौडबंगाल आहे. तुम्ही नेहमीच ओबीसींच्या मुद्द्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे आम्हाला भिती वाटते की हे वेगळं काही तरी आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता पुढे काय करायचे ते ठरवा.’

मानसन्मान राखू; पण चुकीची वक्तव्ये नको

मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या लोकांना संधी देताना जुन्या-जाणत्यांना थांबावे लागले. त्यातून काही ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. त्यांना केंद्रात काम करण्याची संधी देत त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल. त्यात तसूभरही कमी पडणार नाही, परंतु त्यांनीही चुकीची वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता टोला लगावला. बीड, परभणीत घडलेल्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. न्यायालयामार्फत तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी केली जाईल. या घटनांमधील मास्टरमाईंड कितीही मोठा असू द्या, त्याला सोडणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.