
मृत्यूच्या दारात असणाऱ्यांचे प्राण वाचविण्यासारखे पुण्याचे काम अजूनही होत असल्याची प्रचिती नुकतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बागल यांच्या कर्तुत्वामुळे आली. विक्रोळी येथे तिघे तरुण भयंकर अपघातात सापडले होते. रक्ताच्या थारोळ्यात जणू एक जण शेवटची घटकाच मोजत पडला होता. त्याची वेळ आली होती, पण प्रकाश बागल यांच्या रुपात साक्षात देवदूत तरुणांच्या रक्षणाला आला आणि त्या तरुणाला जीवदान मिळाले.
शनिवारी सकाळी 10 वाजता मुंबई पोलीस मुख्यालयात गुन्हे परिषद असल्याने कांजूरमार्ग येथे राहणारे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बागल घरातून निघाले होते. विक्रोळी येथे सर्व्हिस रोडने पोहचताच बागल यांच्या नजरेस नागरिकांची गर्दी दिसली. या ठिकाणी तिघे तरुण रस्ता दुभाजकावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. तर लोक मदतीचा हात देण्याऐवजी मोबाईलमध्ये त्यांचे चित्रीकरण करण्यात दंग होते. यावेळी बागल यांनी त्या तिघांना आपल्या पोलीस जीपमध्ये घेतले आणि सायरन वाजवत गाडी थेट गोदरेज इस्पितळात नेली. या दुर्घटनेत शाहीद खान (19) याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र बागल यांच्यामुळे त्याचा जीव वाचला.
कर्तव्याला प्राधान्य…
बागल यांनी कसलाच विचार न करता त्या तरुणांना मदतीचा हात दिला. त्यांची जीप, जीपमधील फायली तरुणांच्या रक्ताने अक्षरशः माखल्या. पण त्याची कसलीही चिंता न करता बागल यांनी माणुसकी धर्म पाळला. त्यांच्या या कर्तृत्वाचे पोलीस दलातून कौतुक होत आहे.
परिषदेत आयुक्तांच्या त्या सूचना
तरुणांना इस्पितळात पोहचवून बागल लगबगीने गुन्हे परिषदेला पोहचले. त्या परिषदेत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना एक कानमंत्र दिला. रस्त्यात कोणी अपघातग्रस्त व्यक्ती असतील तर त्यांना तत्काळ मदत करा. अपघातानंतरचा प्रत्येक क्षण हा जखमी व्यक्तीला मृत्यूच्या जवळ नेत असतो. त्यामुळे माणुसकी दाखवा, असे आवाहन आयुक्तांनी केले.