यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप आयोजनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता यावर आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्येही चर्चा होणार आहे. श्रीलंकेत ही बैठक होत असून या बैठकीपूर्वीच आयसीसीच्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली असून या राजीनाम्यांना आयसीसी टी-20 वर्ल्डकप आयोजनातील गोंधळ कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
श्रीलंकेत 19 जुलै, 2024 पासून आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीआधीच नुकत्यात पार पडलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या आयोजनाची जबाबदारी असणाऱ्या 2 ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या वर्ल्डकपचे इव्हेंट हेड ख्रिस टेटली आणि मार्केटिंग व कम्युनिशेकनशचे महाव्यवस्थाक क्लेअर फर्लांग अशी राजीनामा दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
‘क्रिकेट नेक्स्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी टी-20 वर्ल्डकप आयोजनातील गोंधळावरून आयसीसीच्या अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. विशेषत: अमेरिकेमध्ये घेण्यात आलेल्या सामन्यांवर बजेटपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. असोसिएट सदस्य संचालक पंकज खिमजी यांनी सर्व सदस्यांना एक पत्र लिहून टी-20 वर्ल्डकप आयोजनावर झालेल्या खर्चाचे ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे.
उधारीची बॅट अन् क्रिकेटमधील चेटूक; आफ्रिदी ते अभिषेक शर्मा, काय सांगतो इतिहास?
टी-20 वर्ल्डकप दरम्यान अमेरिकेत झालेल्या सामन्यांना अपेक्षेप्रमाणे चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकप सामन्यांहून अधिक खर्च अमेरिकेत झालेल्या सामन्यावर झाला होता. अमेरिकन क्रिकेटच्या अधिकाऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला.
टी-20 वर्ल्डकप दरम्यान कोणताही दुरदृष्टीकोन न ठेवता चौफेर खर्च करण्यात आला. एकाच साईटवर हजारो डॉलर खर्च करण्यात आले. यानंतर प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. स्पर्धेदरम्यान कोणतेही नियोजन दिसले नाही, अशा शब्दात अमेरिकन क्रिकेटच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीची खरडपट्टी काढली.