तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा धि गोवा हिंदू असोसिएशनचा ‘मास्टर दत्ताराम चतुरस्र कलावंत’ पुरस्कार जाहीर झाला. शनिवार, 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथे आयोजित दिमाखदार सोहळय़ात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मंगेश कदम यांनी नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्व माध्यमात आपला ठसा उमटवला आहे. ‘अधांतर’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘तन-मन’ अशा अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. केवळ दिग्दर्शनच नाही तर अभिनयातही त्यांनी मुशाफिरी केली. ‘असा मी-असामी’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘आमने-सामने’, ‘इवलेसे रोप’ अशा अनेक बहारदार कलाकृती आपल्या अभिनयाने लोकप्रिय केल्या.
मनोरंजन विश्वातील त्यांच्या प्रदीर्घ सक्रिय कामगिरीची दखल ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने घेतली आहे. यानिमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना कदम म्हणाले, ‘मधुकर तोरडमल, सुधा करमरकर, डॉ. लागू, जयंत सावरकर, विजयाबाई मेहता अशा दिग्गजांचा सन्मान करणारी संस्था त्या पुरस्कारासाठी आपले नाव जाहीर करते, तेव्हा तो कलाकार म्हणून आमचा बहुमान असतो आणि निश्चितच जबाबदारीही वाढते. यापुढेही माझ्याकडून रंगभूमीची आणि रसिक मायबापांची सेवा होत राहील, अशी मी खात्री देतो.’