म्हणून पंतप्रधान मोदी परदेशात पळून गेले, काँग्रेस नेते राज बब्बर यांची टीका

महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे, संस्कृती, परंपरा आहे. या राज्याच्या मान, सन्मान, प्रतिष्ठेला इतर राज्यातून येऊन कोणीही धक्का लावू शकत नाही. धर्माच्या आधारावर विभागणी महाराष्ट्रात चालणार नाही, हे लक्षात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सोडून परदेशात पळाले, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनी केली.

राज बब्बर यांनी ‘व्होट जिहाद’च्या मुद्दय़ावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपकडून नेहमीच जातीधर्मात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण देशातील जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला जोरदार धक्का दिला. आता  विधानसभेलाही भाजपला धडा शिकवा असे राज बब्बर पत्रकार परिषदेत म्हणाले.