खोपोलीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेल्या रमाधाम वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक शुभेच्छापत्रे बनवली असून त्यावर सुंदर संदेशही लिहिले आहेत. रंगीत कार्ड पेपर, स्केच पेन्स, कात्री, गम असे साहित्य घेऊन हे आजी-आजोबा शुभेच्छापत्रे बनवण्यात रंगून गेले होते. यानिमित्ताने ‘रमाधाम’मध्ये आनंदाचे दीप उजळले असून आजी-आजोबांच्या या कलाकृतींचे कौतुक करण्यात येत आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांनी 1990 मध्ये खोपोलीतील रमाधाम वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. येथील प्रशस्त खोल्या, सकस जेवणाची सोय, भरपूर पाणी आणि साद घालणारा निसर्ग यामुळे वृद्धांना रमाधाम म्हणजे आपले दुसरे घरच वाटते. दरवर्षी येथे रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांच्या पुढाकाराने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. व्यवस्थापनाने यंदा शुभेच्छापत्रे बनवण्यासाठी येथील आजी-आजोबांना पेन्सिल, पट्टी, कात्री, स्केचपेन, रंगीबेरंगी कागद असे साहित्य पुरवले.
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
विविध संकल्पनांवर आधारित दिवाळी शुभेच्छापत्रे बनवताना आजी-आजोबा आपल्या बालपणातील आठवणींमध्ये हरवून गेल्याचे दिसून आले. या वयातही प्रचंड उत्साह दिसत होता. यावेळी रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, अथश्री आस्था संस्थेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉ. विजय रायकर, निवासी डॉक्टर नेहा कायंदे, निवासी व्यवस्थापक विनोद सैद, सुभाष पाटील, रजनी जोशी, गायतोंडे आजी-आजोबा, दिवेकर आजी-आजोबा, राजेश वीरकर, प्रकाश मगदूम, चिटणीस आदी उपस्थित होते.