मुख्यमंत्र्यांच्या मोफत तीर्थक्षेत्र वारीपूर्वी ज्येष्ठांना करावी लागते हॉस्पिटलची ‘वारी’, फिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयाच्या खेटा

राज्यातील लाडक्या बहिणींनंतर ज्येष्ठ नागरिकांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने मोफत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली. पण या योजनेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयाचे फिटनेस सर्टिफिकेट सक्तीचे केले आहे. पण सरकारी रुग्णालयातील हृदय रोग, त्वचा रोग, श्वसन विभाग अशा विविध विभागांमध्ये जाऊन आरोग्य तपासण्या करताना ज्येष्ठ नागरिकांची चांगलीच फरफट होत आहे. कोणत्याही सरकारी रुग्णालयात या सर्व चाचण्या एका दिवसात होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेपूर्वी रुग्णालयाच्या वाऱ्या करण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारच्या वतीने प्रतीव्यक्ती  तीस हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.

ट्रक्टर वगळून नोंदणीकृत चार चाकी वाहन कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असल्यास योजनेत सहभागी होता येणार नाही.

प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावा. उदाहारणार्थ टीबी, हृदयाशी संबंधित रोग, श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोबोसीस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग

वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकाला सादर करावे लागेल.

 ज्येष्ठ नागरिक फिट कसा असेल?

कोणत्याही सरकारी रुग्णालयात एका दिवसात फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकाला काही ना काही तरी विकार-व्याधी असते. तो फिट कसा असेल? काहीतरी विकार आढळला तर प्रमाणपत्र मिळणार नाही. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रवास, चाचण्यांचे पैसे आणि वेळही वाया जाणार अशी भीती आहे. मुख्यमंत्र्यांची मोफतची तीर्थयात्रा नको आणि सरकारी चाचण्याही नको, अशी मानसिकता ज्येष्ठांची झाली आहे.