
‘जय महाराष्ट्र! उद्धव ठाकरे बोलतोय. खूप खूप शुभेच्छा! आणि इथून मी आपल्याला नमस्कार करतो. तुमची व्यंगचित्रं बघत बघत आम्ही मोठे झालो आहोत. तुमची ओळख व्यंगचित्रांतून जास्त झालेली आहे. पुण्यात आल्यावर मी नक्की भेटायला येईन,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे अभीष्टचिंतन केले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी आज शंभराव्या वर्षात पर्दापण केले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून शि. द. फडणीस यांचे अभीष्टचिंतन केले आणि आशीर्वाद घेतले.
शिवसेनेच्या वतीने शि. द. फडणीस यांच्या घरी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून शि. द. फडणीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना उपनेते, माजी मंत्री शशिकांत सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरपुडे, वास्तुविशारद दिलीप काळे, युवासेना समन्वयक युवराज पारीख उपस्थित होते.
ठाकरे कुटुंबाने कलेसाठी एक कोपरा नेहमीच राखून ठेवला
शि. द. फडणीस उद्धव ठाकरे यांना म्हणाले, ‘तुमचा नमस्कार पोहोचला आणि आठवणही झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे कुटुंबाकडे कलेचा वारसा आहे. राजकारण वेगळे, पण ठाकरे कुटुंबाने कलेसाठी एक कोपरा नेहमीच राखून ठेवला आहे. आपली चिपळूणमध्ये गाठ पडली तेव्हा तुम्हीच मला ‘फटकारे’ हे पुस्तक भेट दिले होते. ती आठवण अजून माझ्या लक्षात आहे.’