आता व्हॉट्सऍपवरून केवळ मेसेजच नव्हे तर पैसेही पाठवणे सहजसोपे होणार आहे. हिंदुस्थानात व्हॉट्सऍपला मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉट्सऍपची यूपीआय युजर ऑनबोर्डिंग मर्यादा तत्काळ काढून टाकली आहे.
एनपीसीआयने यासंदर्भात निवेदन जारी केलंय. या निर्णयामुळे व्हॉट्सऍपला हिंदुस्थानातील आपल्या सर्व युजरसाठी यूपीआय सेवा देता येईल. म्हणजेच ‘व्हॉट्सऍप पे’वरून पैसे पाठवणे सहज शक्य होईल. याआधी एनपीसीआयने ‘व्हॉट्सऍप पे’ला टप्प्याटप्प्याने यूपीआय युजर बेस वाढवण्याची परवानगी दिली होती. हिंदुस्थानात यूपीआय फ्रेमवर्कचे संचालन करणाऱ्या एनपीसीआयने सुरुवातीला ‘व्हॉट्सऍप पे’सारख्या पेमेंट सर्विसेसवर युजर्स ऑनबोर्डिंग मर्यादा लावली होती.