मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा शिवसेना, युवासेनेनं जिंकल्या. त्यानंतर शनिवारी मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. सिनेटच्या निवडणुकीत दिसलेला हा ‘दस का दम’ आहे. ही फक्त सुरुवात असून विधानसभेचा गुलाल उधळायचा आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
विजय काय असतो, ते आपण दाखवून दिलं आहे, करुन दाखवलं आहे. असाच विजय आपल्याला विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवायचा आहे, त्याची ही सुरुवात आहे. या विजयातून निष्ठा काय असते, ते दाखवून दिले आहे. राजन कोळंबकर यांनी हे सिद्ध केलं आहे. विजयाचा सर्वात पहिला सन्मान राजन कोळंबकर यांचा आहे. राजन यांनी निष्ठा काय असते हे दाखवून दिलं आहे. मागच्या दोन्ही टर्ममध्ये ते सिनेट सदस्य होते. यावेळी त्यांना सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल. काही चेहरे बदलायचे आहेत. नवीन नावं द्यायचं आहे. ते म्हणाले, तुम्ही कुणालाही उमेदवारी द्या. मी दहाच्या दहा लोकांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं राजन म्हणाले होते. ते त्यांनी खरे करून दाखवले, असे ते म्हणाले.
असाच विश्वासाचा माणूस म्हणजे सूरज चव्हाण. त्याची भिती वाटत असल्यानेच मिंधे आणि भाजपने त्याला आत टाकले आहे. आता लवकरच विधानसभेचा विजय साजरा करताना तो आपल्यासोबत असेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. मुंबई विद्यापीठ फक्त मुंबईसाठी मर्यादीत नसून पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कल्याण डोबिंवली, मीरा भाईदर या सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात आपले काम असते.आता आपण विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी हेल्पलाईन सुरू करणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
वरुण सरदेसाई यांचंही आदित्य ठाकरेंनी कौतुक केलं. वरुणचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्व गणितं वरुण मांडत असतो. मी परवा चिडवत होतो की वरूण स्थगिती येईल बघ. आपल्या सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली. आपण दोन वर्षापासून काम करत आहोत. आपण विभागप्रमुखांपासून सर्वांना फोन करून पदवीधरांची नोंदणी करून घ्यायला सांगितलं होतं. हे 40 गद्दार होते, तेवढी नोंदणी झाली नाही ती यावेळी झाली. 40 गद्दार आपल्यासोबत होते, तेव्हा झाली नव्हती, एवढी नोंदणी सर्वांना गेल्या वर्षात करून दाखवली. यालाच घाबरून मिंधे आणि भाजपने दोनवेळा निवडणूक रद्द केली. तसेच या झालेल्या निवडणुकीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त मते आपल्याला मिळाली आहेत. तरुणांना, पदवीधरांचा आणि सुशिक्षितांचा विश्वास उद्धव बाळासाहेब या नावावर विश्वास आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. आज आपण विजयाचा गुलाल उधळला, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही आपल्याला गुलाल उधळायचा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तयारीला आतापासून लागा, असे आवाहनही त्यांनी केले. जनतेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवला तसाच विश्वास विधानसभा निवडणुकीत जनता आपल्यावर आणि महाविकास आघाडीवर दाखवेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हा विजय मिळाला आहे, यालाच दस का दम म्हणतात. याआधी 2010 मध्ये 8 त्यानंतर 2018 मध्ये 10 आणि आता पुन्हा सर्वच्यासर्व 10 जागांवर आपण विजय मिळवला आहे. ज्यांना फोडायचे आहे, त्यांना फोडू द्या, ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे. मात्र, जनतेचा विश्वास कोणीही तोडू शकत नाही. लोकसभा निवडणूक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक आणिआता सिनेटच्या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने आहे, ते स्पष्ट झाले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
कायदा सुव्यवस्थेची स्थिती राज्यात ढासळली आहे. राज्याला गृहमंत्री आहे की नाही, असा प्रश्न निर्माणा व्हावा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दररोज हाय अलर्ट असणार आहे.कोणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे आता मुंबईसह राहिलेल्या महापालिका आणि विधानसभेच्याही निवडणुका आता घेण्यात याव्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.आता सिनेट निवडणुकीत मिळालेला विजय आणि उधळलेला गुलाल यातूनच निवडणुका का घेण्यात आल्या नाही, याचे उत्तर मिळेल, असा टोला लगावत मिंधे आणि भाजप पराभवाला घाबरत असल्याचे यातून स्पष्ट होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.