
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरसावे उड्डाणपुलावर वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्यांच्या काशिमीरा वाहतूक पोलिसांनी पावत्या फाडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी 325 प्रवाशांकडून दंड आकारला आहे. उड्डाणपुलावर वाहन थांबवण्यासाठी मनाई असताना अनेक प्रवासी सिगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ देण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी गाड्या थांबवत असल्याने या बेशिस्त प्रवाशांना चाप बसावा यासाठी पोलिसांनी ही दंडात्मक कारवाई केली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वरसावे पुलावर वाहने थांबवण्यास प्रतिबंध लावला आहे. वाहतूक पोलिसांतर्फे पुलाच्या दोन्ही वाहिन्यांवर नो पार्किंग झोनचे फलकदेखील लावण्यात आले आहेत. मात्र मुंबई, ठाणे ते गुजरात असा प्रवास करणारे प्रवासी नियम धाब्यावर बसवत गाड्या पुलावर थांबवत असल्याने ही दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.