अभिप्राय – तरुणाईच्या अंतरंगात…

>> प्रशांत गौतम

अरविंद जगताप यांचा ‘सेल्फी’ या लेखसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. संवेदनशीलता आणि तटस्थता जपत शैलीदार लेखन करणे ही त्यांची खास ओळख आहे. तळागाळातील परिस्थितीचा ते गांभीर्याने विचार करून चिंतन करतात व लेखन माध्यमातून व्यक्त होत असतात. एखाद्या घटनेचे सूक्ष्म निरीक्षण करून मांडलेले लेखन वाचकांच्या मनात स्थान करते. ग्रामीण भागाचे, व्यक्तिरेखांचे अचूक निरीक्षण प्रभावी ठरते. बीड जिल्हय़ातील पाडाळसिंगी या गावातून पंचविसेक वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता पुणे-मुंबईत स्थिरावला आहे.

प्रस्तुत ‘सेल्फी’ या नव्या संग्रहात त्यांनी वाचकांच्या अंतरंगात शिरून मनाचा ठाव घेतला आहे. त्यातील वैविध्यपूर्ण लेखांची नावे जरी बघितली तरी विषयाचे वेगळेपण आपल्या लक्षात येते. लेखनाचा विषय साधासोपा आहे; पण त्यातून ते मोजक्या शब्दांत, चपखलपणे असे काही लिहून जातात, तेव्हा त्यांच्यातील प्रतिभावंताची आपल्याला ओळख पटते. त्यांच्या लेखनाचे बलस्थान म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे संवेदनशीलता आणि तटस्थता जपत शैलीदार लेखन आणि ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अवलोकन, व्यक्तिरेखांचे निरीक्षण हे सांगता येईल.

या पुस्तकात अपामणिका, प्रस्तावना नाही. मलपृष्ठाचे पान हेही त्यांच्याच भूमिका लेखनातून घेतले आहे. प्रस्तुत लेखसंग्रहात छोटय़ा छोटय़ा गोष्टी,एकांकिका, रोजचे प्रसंग असे बाज असलेले लेख आहेत. उपरोक्त शीर्षकांच्या नावावरूनच विषयाची विविधता, रंजकता आपल्या लक्षात येऊ शकते. काय आहे ‘सेल्फी’… लेखसंग्रहाच्या मलपृष्ठावर लेखकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात ते म्हणतात –
‘’सेल्फी’ नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो, पण त्यानिमित्ताने आपले दोषच खूप दिसतात. आपण बरं दिसण्यासाठी बदल आधी आपल्या स्वत:मध्ये गरजेचा असतो. बरं, दिसणं म्हणजे चेहरा आणि रंग नाही. या सगळ्या सेल्फी एकत्र केल्या तर समाज म्हणून आपण बरे दिसतो का? हा विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण आपल्यात डोकावून बघणं गरजेचं आहे. तरुणाईच्या अंतरंगात डोकावण्याचा हा प्रयत्न आहे. तरुण पिढीसाठी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. हे लेख ‘सेल्फी’सारखे आहेत; आपण आपल्याकडेच बघण्यासारखे.” वाचकांनी आवर्जून वाचावा असा हा संग्रह आहे. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ या लेखसंग्रहास लाभले आहे.

सेल्फी लेखक : अरविंद जगताप पृष्ठे : 160,
मूल्य : रु.200 प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे