एसपीजीची क्रिकेटपटू गुणवत्ता शोधमोहीम शुक्रवारी

हिंदुस्थानी क्रिकेटला 22 कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच देणाऱ्या जगद्विख्यात शिवाजी पार्क जिमखान्याने (एसपीजी) आपली गुणवान क्रिकेटपटू घडवण्याची मोहीम कायम राखण्यासाठी यंदाही गुणवत्ता शोधमोहीम आयोजित केली आहे. येत्या 10 जानेवारीला सकाळी 8 वाजता एसपीजीच्या खेळपट्टीवर 16 व 18 वर्षांखालील मुलांची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीतून प्रत्येकी 20-20 खेळाडूंची निवड केली जाणार असल्याची माहिती जिमखान्याचे सरचिटणीस संजीव खानोलकर यांनी दिली.

मुंबई क्रिकेटला क्रिकेटपटूंच्या रत्नांची खाण देण्यात नेहमीच सर्वात पुढे असलेला शिवाजी पार्क जिमखाना गेली दीड दशके आपल्या अॅपॅडमीच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटू घडवत आलाय. यावेळीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

1 सप्टेंबर 2009 नंतर जन्मलेल्या खेळाडूंना 16 वर्षांखालील तर 1 सप्टेंबर 2007 नंतर जन्मलेल्या खेळाडूंना 18 वर्षांखालील संघात चाचणी देता येणार आहे. ही चाचणी गुणवान खेळाडूंसाठीच आयोजित करण्यात आली असून यात केवळ गुणवत्तेची निवड केली जाणार आहे. येथे कोणाचाही वशिला चालणार नसल्याची परखडपणे खानोलकर यांनी सांगितले.

दोन्ही गटांत निवड केलेल्या 40 खेळाडूंना वर्षभर अगदी विनामूल्य दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यात आपली गुणवत्ता दाखवणाऱया खेळाडूंना शिवाजी पार्क जिमखान्याचा संघात खेळण्याची संधी लाभेल, अशीही माहिती सरचिटणीस खानोलकर यांनी दिली. या प्रशिक्षण शिबीरासाठी इच्छुक क्रिकेटपटूंनी सोबत निवास, जन्मदाखल्याची मूळ प्रत आणणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.