श्वसन मार्गातील जंतुसंसर्गामुळे गेले 25 दिवस येथील एम्स रुग्णालयात दाखल असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे अखेर गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
ताप येऊन प्रकृती खूप बिघडल्यामुळे त्यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ते 72 वर्षांचे होते. जंतुसंसर्ग बळावत गेल्यामुळे गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. आज दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी आमचे प्रिय कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे उपचारांदरम्यान निधन झाले, अशी माहिती माकपने एक्सवर दिली आहे.
तडजोड न करणारे नेतृत्व हरपले उद्धव ठाकरे यांच्याकडून आदरांजली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सीताराम येचुरी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ‘सीताराम येचुरी यांचे हे जाण्याचे वय नव्हते. राजकारणातील पाच दशके त्यानी संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेली त्यांची यात्रा कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिव पदावर येऊन संपली. उत्तम वक्ता, अर्थ विषयाचा अभ्यासक, तत्त्वांशी तडजोड न करणारा नेता, डाव्या चळवळीतील संयमी आणि प्रसन्न चेहरा असे येचुरी होते. इंडिया आघाडीच्या बैठकीत ते भेटत व मोकळेपणाने बोलत. सगळय़ाच राजकीय पक्षांत ते प्रिय होते. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक आहे. त्यांना आमची विनम्र श्रद्धांजली.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी येचुरी यांना आदरांजली अर्पण केली.
राहुल गांधी यांना दुःख
सीताराम येचुरी माझे चांगले मित्र होते. आपल्या देशाबद्दल त्यांना सखोल अशी समज होती. इंडिया या कल्पनेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. आमच्या होणाऱया प्रदीर्घ चर्चा माझ्या कायम स्मरणात राहतील. या कठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांसोबत माझ्या सद्भावना आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर आपले दुःख व्यक्त केले आहे.
– डाव्यांचे एक प्रमुख नेतृत्व असलेले येचुरींमध्ये सर्वच राजकीय प्रवाहांच्या संपर्कात राहाण्याची क्षमता होती. त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे. डाव्या पक्षांच्या नेत्यांसह विविध राजकीय नेत्यांनीही येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हिंदुस्थानच्या राजकारणात अढळ स्थान
विद्यार्थी नेता ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव अशी दीर्घ राजकीय कारकीर्दीत येचुरी यांनी हिंदुस्थानच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलने झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला होता. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता, त्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिका यामुळे ते डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते म्हणून दीर्घ वाटचालीत समोर आले होते.
सीताराम येचुरी यांनी 1974 साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. 1975 साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. 1977-78मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. 1984 साली माकपच्या पेंद्रीय समितीचे सदस्य म्हणून त्यांचा पॉलीट ब्युरोमध्ये प्रवेश झाला. 2015, 2018 आणि 2022 असे तीन वेळा ते माकपच्या महासचिवपदी निवडून आले होते. त्यांनी तब्बल 12 वर्षे राज्यसभेत खासदार म्हणून कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग यांच्यासाठी किल्ला लढवला होता.
जेएनयू उभारण्यात सीताराम येचुरी यांचे मोठे योगदान – संजय राऊत
सीताराम येचुरी यांच्या निधनाने एक अभ्यासू नेता आपल्यातून हरपला आहे. दिल्लीत आज जेएनयू जे दिसतंय त्याच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. कोणतीही तडजोड न करता काम करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. इंडिया आघाडी एकत्रित ठेवण्यासाठी कायम त्यांचा पुढाकार होता, असा आदरभाव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मृत्यूनंतरही समाजाच्या कामी… येचुरींचे देहदान
आयुष्यभर कष्टकरी व कामगार, शेतकऱयांसाठी स्वतःला झिजवणारे सीताराम येचुरी यांचा देह मृत्यूनंतरही समाजाच्या कामी आला आहे. जिथे त्यांचे निधन झाले त्याच एम्स रुग्णालयाला येचुरी यांचे पार्थिव संशोधनासाठी देण्याचा निर्णय येचुरींच्या पुटुंबीयांनी घेतला. तसे निवेदनही एम्स रुग्णालयाने प्रसृत केले आहे. त्यामुळे आयुष्यभर कष्टकऱयांसाठी लढले आणि मृत्यूनंतरही समाजाच्या कामी आले, अशीच त्यांची इतिहासात नोंद झाली आहे. एम्स रुग्णालयातील विद्यार्थ्यांना संशोधन आणि शिक्षणासाठी त्यांचा देह वापरला जाईल.