पहलगाम हल्ल्यासंदर्भात ‘चिथावणीखोर’ पोस्ट; गायिकेविरुद्ध देशद्रोहाचा गु्न्हा

Neha Singh Rathore Singer

पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात एका विशिष्ट धार्मिक समुदायाला लक्ष्य करून चिथावणीखोर सोशल मीडिया पोस्ट करणे देशाच्या ऐक्याला धोका ठरू शकतात, अशी तक्रार केल्यावर पोलिसांनी लोकगायिका नेहा सिंग राठोड हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

‘या परिस्थितीत, गायिका आणि कवयित्री नेहा सिंग राठोड हिने तिचे X हँडल @nehafolksinger वापरून काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. अशा पोस्ट राष्ट्रीय अखंडतेवर प्रतिकूल परिणाम करू शकतात आणि धर्माच्या आधारे एका समुदायाला दुसऱ्या समुदायाविरुद्ध भडकवण्याचा वारंवार प्रयत्न केल्याचे दिसत आहे’, असे तक्रारदार अभय प्रताप सिंग यांनी म्हटले आहे.

लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी हिंदुस्थानच्या न्याय संहिता (BNS) अंतर्गत अनेक आरोपांवर या गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये सांप्रदायिक द्वेष वाढवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि हिंदुस्थानचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणे यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन गुन्हेगारी संहिता कलम 152 अंतर्गत देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या समान आरोपांशी संबंधित आहे.