जम्मू-करश्मीरच्या बारामुल्ला आणि सोपोरमध्ये गुरुवारी रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेली चकमक आज दुसऱया दिवशीही सुरूच होती. 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांची शोधमोहीम राबवली. दरम्यान, गुरुवारी किश्तवाडमधील आधवारी भागात दहशतवाद्यांनी 2 ग्राम संरक्षण रक्षकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ जम्मू – कश्मीरमध्ये ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
सोपोरमधील पानीपोरा आणि सगीपोरा भागात गुरुवारी रात्रभर गोळीबार सुरू होता. आज सकाळपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्याआधी गुरुवारी मुंजारा धार जंगलात गुरे चरण्यासाठी गेलेल्या ग्रामरक्षकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ओहली-कुंटवाडा येथील ग्रामरक्षक नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून तीव्र शोधमेहीम हाती घेण्यात आली.
कश्मीर टायगर्सने स्वीकारली हत्येची जबाबदारी
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कश्मीर टायगर्स गटाने ग्रामरक्षकांवर हल्ला आणि हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. कश्मीर टायगर्सने सोशल मीडियावर संरक्षण रक्षकांच्या मृतदेहांची छायाचित्रेही शेअर केली. दोघांच्या तोंडातून रक्त येत असून डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे छायाचित्रांमध्ये दिसत आहे. कश्मीर स्वतंत्र होत नाही तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहाणार असल्याचे फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री दुःखी, राज्यपाल म्हणाले बदला घेणार
जम्मू- कश्मीरमध्ये अशाप्रकारच्या घृणास्पद हिंसाचाराच्या घटना शांततेत अडथळा ठरत असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तर किश्तवाड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. आम्ही सर्व दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा आणि या हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे असे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे.