निवडणुकीसाठी समुद्रमार्गे ‘खोके’ येण्याचा धोका, केंद्रीय निवडणूक आयोगाचा अलर्ट… जेएनपीए बंदरातील वाहतुकीवर करडी नजर

महाराष्ट्रात निवडणुकीसाठी समुद्रमार्गे खोकेतसेच मद्याचा साठा येण्याचा धोका आहे. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षक विभागाच्या पथकानेच याबाबत अलर्ट जारी केला आहे. यासाठी जेएनपीए बंदरातील वाहतुकीवर करडी नजर ठेवण्याची सक्त ताकीद यंत्रणेला देण्यात आली असून पुढील 20 ते 22 दिवस बोटींमधून उतरणाऱ्या प्रत्येक कंटेनरची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यामुळे हवालामार्गे पैशांसाठी सेटिंग लावलेल्या काही उमेदवारांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या जेएनपीए बंदरातून अनेकदा शेकडो कोटींचे रक्तचंदन, मद्य साठा, सोन्याची तस्वरी होत असते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून तस्वरांनी ही उलाढाल केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचा धुरळा उडाला असून गेल्या काही दिवसांत शेकडो कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. परदेशातून समुद्रमार्गे पैसे तसेच मद्याचा मोठा साठा येण्याचा धोका वर्तवण्यात येत असून याची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. पनवेल, पेण, कर्जत कार्यक्षेत्रातील कामकाजाची निवडणूक खर्च किभागाच्या पथकाकडून आढाका घेण्यात आला. या बैठकीत जेएनपीए बंदरातून होणाऱ्या वाहतुकीवर विशेष लक्ष देण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी विविध पथकांच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय खर्च निरीक्षक रमेश कुमार यांनी समुद्रमार्गे तस्वरी होणाऱ्या प्रत्येक मालाची कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.   

शंभर कोटींची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज्यात मिंधे आणि भाजप उमेदवारांकडे पैशांचे घबाड सापडले आहेत. अवघ्या आठवडाभरात राज्यात यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू जप्त करण्यात आली. ही कारवाई 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत करण्यात आली असून एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

मिंधेभाजपला पराभवाची भीती

सत्ता आणि पैशांचा वारेमाप वापर करूनही मिंधे-भाजपचा लोकसभा निवडणुकीत बार फुसका निघाला. त्यामुळे पराभवाच्या भीतीने सत्ताधारी  कोणत्याही थराला जाऊ शकतात. परदेशातून हवालामार्गे महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडण्याची भीती सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. या सर्व शक्यतांमुळेच  निवडणूक आयोगाने जेएनपीए बंदरातील व्यवहारांवर करडी नजर ठेवली असल्याची चर्चा आहे.   

जासई कार्यालयाला दिली अचानक भेट

निवडणूक खर्च निरीक्षक रमेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाच्या अधिकाऱ्यांनी जासई येथील निवडणूक कार्यालयाला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. याप्रसंगी आढावा पथकासोबत रमेश कुमार, सहाय्यक खर्च निरीक्षक सुभाष पवार, सहाय्यक संचालक प्रवीण कडगावे, उरण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी जे. ए. कासार तसेच पनवेल, पेण, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, एसीपी डॉ. विशाल नेहूल आदी अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.