पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, RAW च्या माजी प्रमुखांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक

पहलगम हल्ल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एक मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात (एनएसएबी) मोठे बदल केले आहेत.

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ पुर्नगठीत केले आहे. रिचर्स अँड अ‍ॅनालिसिस विंगचे प्रमुख आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी एअर कमांडर पी.एम. सिन्हा, माजी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह, रिअर अ‍ॅडमिरल मोंटी खन्ना, राजीव वर्मा यांच्यासह लष्करी व पोलीस दलातील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे मुख्य काम देशाच्या सुरक्षेसंबंधीच्या मुद्द्यांचे विश्लेषण प्रदान करणे, सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाय आणि धोरणात्मक पर्यायांची शिफारस करणे हे प्रमुख काम आहे. आता या मंडळाच्या प्रमुखपदी रॉचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत आलोक जोशी?

– आलोक जोशी हे रॉचे माजी प्रमुख आहेत.
– राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर बाबींमधील ते तज्ज्ञ आहेत.
– आलोक जोशी यांनी 2012 ते 2014 पर्यंत रॉचे प्रमुख म्हणून का पाहिले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या कारवायांचे नेतृव्त केले.
– आलोक जोशी हे अनुभवी गुप्तचर अधिकारी आहेत.
– हिंदुस्थानच्या सुरक्षेला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मोदींच्या बैठकांवर बैठका

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक पार पडली. सकाळी 11 वाजता ही बैठक सुरू झाली. यानंतर सीसीपीए, सीसीईएसह जवळपास 6 बैठका पार पडल्या. एका मागोमाग एक 6 बैठका झाल्यानंतर मोदी पीएमओकडे रवाना झाले.