पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषकाच्या दिमाखदार आयोजनानंतर हा आजवर सर्वसामान्यांचा असलेला मऱहाटमोळा खेळ सर्वांचा होणार आणि जगात आपली वेगवान ओळख निर्माण करणार असल्याचे संकेत मिळाले होते. पहिल्या विश्वचषक आयोजनाचा जल्लोष शांत होत नाही तोच जागतिक आणि हिंदुस्थानी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू दुसऱया विश्वचषकाची घोषणा करत खो-खोप्रेमींना आणखी एक आनंदाची बातमी दिली. एवढेच नव्हे तर दुसरा विश्वचषक 2027 साली चक्क सातासमुद्रापार इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात खेळविला जाणार असल्याचेही जाहीर केले.
गेली चार-पाच दशके जागतिक स्तरावर आपली अपेक्षित ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या खो-खोने आता कात टाकली आहे. दोन वर्षांपूर्वी अल्टिमेट खो-खो लीग सुरू झाल्यापासून जागतिक स्तरावर खेळाची ओळख निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे हिंदुस्थानी खो-खो महासंघाने आणखी एक दमदार पाऊल टाकताना यंदा खो-खोचा वर्ल्ड कप घेण्याचे धाडस दाखवले. विशेष म्हणजे या पहिल्यावहिल्या स्पर्धेत पुरुषांचे 20 तर महिलांचे 19 संघ सहभागी झाल्याने महासंघाची ताकद अवघ्या जगाला दिसली. त्यामुळे सुधांशू मित्तल यांनी खो-खो अब रुकेगा नहीं और झुकेगा नहीं असे म्हणत राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकमध्येही खो-खोची वेगवान चपळता दिसेल, असा विश्वास व्यक्त केला होता.
…म्हणूनच बर्मिंगहमची निवड
पहिला खो-खो वर्ल्ड कप आधी बर्मिंगहम येथेच आयोजित करण्याचे हिंदुस्थानी महासंघाचे प्रयत्न होते, पण ते पूर्ण न होऊ शकल्यामुळे ती स्पर्धा दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. मात्र दिल्लीतील आयोजनानंतर महासंघाचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांनी दर दोन वर्षांनी खो-खो वर्ल्ड कप खेळविणार असल्याचेही संकेत दिले. या स्पर्धेच्या निमित्ताने आगामी विश्वचषकात दोन्ही गटांत प्रत्येकी 30 पेक्षा अधिक संघांचा सहभाग करण्याचेही ध्येय महासंघाने समोर ठेवले आहे. यंदा पुरुषांचे 20 आणि महिलांचे 19 संघ सहभागी झाले होते. त्याचबरोबर बार्ंमगहममध्ये वर्ल्ड कपचे आयोजन केल्यास पाकिस्तानी संघाच्या समावेशाबाबतही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.