
राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोकणसह, कोल्हापूर आणि मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. कोकण आणि कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळे कोयना, चांदोली, राधानगरी, काळमावाडी धरण क्षेत्राची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवारी दुपारी या वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला.
दक्षिणद्वार सोहळ्याबाबतची माहिती भाविकांनी समजली. शनिवार रविवार सुट्टी आहे. तसेच रविवारी गुरूपौर्णिमा उत्सव असल्याने श्री दत्त दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भाविकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद अनेक भाविकांनी घेतला. दक्षिणद्वार सोहळा झाल्याने येथील दत्त देव संस्थानमार्फत भाविकांना स्नानाचा लाभ व्हावा यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे गेल्या चोवीस तासात तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सातत्याने पाणी पातळी वाढल्याने शनिवारी दक्षिणद्वार सोहळा झाल्याने भाविकांसाठी श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या नारायण स्वामी मंदिरात ठेवली आहे. तिथेच मंदिरातील नित्य उपक्रम सेवा पार पडत आहे.