जामगे देवाच्या डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर दुसऱ्यांदा दरड कोसळली; वाहतूक पुन्हा ठप्प

जामगे देवाच्या डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर दुसऱ्यांदा दरड कोसळल्याने हा मार्ग पुन्हा एकदा बंद पडला आहे. दापोली तालूक्यातील जामगे देवाचा डोंगर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर 24 जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्याचा प्रकार घडला होता. रस्त्यात ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडीतील माती, दगड, झाडे आदी बाजूला करून ग्रामस्थांनी मार्ग वाहतुकयोग्य केला होता. दरड बाजूला करण्याच्या या घटनेला 8 दिवसाचा कालावधी लोटत नाही तोच सोमवारी पुन्हा दुसऱ्यांदा एका ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्त्यावरील होणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे.

देवाचा डोंगर हे एक पर्यटन स्थळ आहे. देवाच्या डोंगर नावाच्या चार वाडया असून रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालूक्यात जामगे देवाचा डोंगर नावाची एक वस्ती आहे. दुसरी खेड तालूक्यात तुळशी देवाचा डोंगर नावाची वस्ती, तिसरी मंडणगड तालूक्यात भोळवली देवाचा डोंगर तर रायगड जिल्हयातील महाड तालूक्यात ताम्हाणे देवाचा डोंगर नावाची वस्ती आहे. या वस्तींच्या उंच ठिकाणी शिवाचे मंदिर आहे. दोन जिल्हयातील चार तालूक्यातील देवाचा डोंगर नावाच्या वाडयांचे एकच महसुली गाव नसल्याने या ठिकाणी शासनाच्या नागरी वस्तीसाठीच्या आवश्यक पायाभुत सुधारणांच्या योजना राबविणे तसे शक्य होत नाही. दापोली जामगे देवाचा डोंगर वगळता अन्य ठिकाणच्या वाडयांमध्ये जोडणारा रस्ता नाही. दापोली तालूक्यातील जामगे देवाच्या डोंगरावर येण्यासाठी येथील ग्रामस्थांनी केलेल्या अनेक वर्षांनंतर डांबरी रस्ता करण्यात आला नेमके या रस्त्यावरच आता दरड कोसळली आहे.

दरड कोसळल्याने आता पर्यटकांना येथे येणे धोक्याचे झाले आहे. तसेच येथील रहिवाशांना दररोजच्या आपल्या नियमित कामासाठी पालगड किंवा दापोली येथे येण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्यासाठी रस्त्या अभावी मोठीच अडचण झाली आहे. येथील रहीवाशांची लोकसंख्या लक्षात घेता.त्यात सुरू असलेली भात शेती लावणीची कामे पाहता ग्रामस्थांना श्रमदानाने रस्त्यातील दरड बाजूला करणे तसे शक्य होणार नाही त्यामुळे एक सामाजिक समस्या म्हणून रस्त्यातील दरड हटवून रस्ता तातडीने वातुकयोग्य करावा अशाप्रकारची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.