पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्यामधून रब्बी पिकांच्या सिंचनाकरिता 15 जानेवारीपासून दुसरे आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, नीरा खोऱ्यातील चारही धरणांत 76.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उन्हाळी आवर्तन सोडल्यानंतरही धरणांत पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदा नीरा खोऱ्यांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी धरणात मंगळवारी (दि. 21) सकाळी सहा वाजता 36.901 टीएमसी म्हणजेच 76.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी यादिवशी चारही धरणांत 30.406 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. परिणामी नीरा खोऱ्यांतील धरणांत गतवर्षपिक्षा यंदा सुमारे साडेसहा टीएमसीने अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
मंगळवारी (दि. २१) सकाळी सहा वाजता नीरा खोऱ्यातील पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या नीरा देवघर धरणांत 9.052 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून 77.18 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुरंदर, खंडाळा, फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस व सांगोला तालुक्यांना वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरणांत १९.६५३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून 83.62 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
वीर धरणांत ४.९९८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून ५३.१३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, तर गुंजवणी धरणांत ३.१९८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून ८६.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा खोऱ्यांतील नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी चारही धरणांमध्ये मंगळवारी (दि.२१) सकाळी सहा वाजता ३६.९०१ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. या चारही धरणांमध्ये गतवर्षी आजच्या दिवशी (दि. २१) ३०.४०६ टीएमसी म्हणजे ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणजेच गत वर्षपिक्षा यंदा साडेसहा टीएमसी म्हणजे १३.४४ टक्के पाणी साठा जादा आहे.
सध्या नीरा उजव्या कालव्यातून १ हजार २९९ क्युसेक्सने व नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक्सने रब्बी हंगामातील सिंचनाकरिता दुसरे आवर्तन सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
दुसऱ्या आवर्तनामुळे रब्बी पिकांना फायदा
वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्यातून १५ जानेवारीपासून ८२७ क्युसेक्सने रब्बी हंगामातील सिंचनाकरिता दुसरे आवर्तन सोडण्यात आले. पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ऊस, गहू, हरभरा, मका या पिकांना या पाण्याचा फायदा होणार असल्याने उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हे आवर्तन साधारण ४० दिवस सुरू असते; मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार जलसंपदा विभाग आवर्तन कमी-अधिक | दिवस सुरू ठेवत असते.