खोटी कागदपत्रे सादर केली, रिलायन्स पॉवरवर तीन वर्षांसाठी बंदी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एसईसीआय) तीन वर्षांची बंदी घातली आहे. निविदेत खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे रिलायन्स पॉवर आणि तिची उपकंपनी असलेल्या एनयू बीईएसएस या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे मुंबई शेअर बाजारात आज रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 13 रुपयांची घसरण झाली असून तो 41.47 वर पोहोचला आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जूनमध्ये एक ते दोन हजार मेगावॉट वीज निर्मिती प्रकल्पासाठी निविदा काढली होती. रिलायन्सनेही ही निविदा भरली होती.

कारवाईविरोधात दाद मागणार  

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केलेल्या कारवाईविरोधात आम्ही कायदेशीर दाद मागणार आहोत. आम्ही कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करू तसेच कंपनीच्या 40 लाखांहून अधिक भागधारकांच्या हितासाठी या कारवाईला आव्हान देऊ, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

 

रिलायन्सच्या सल्ल्याने घेतले निर्णय

निविदा भरणारी कंपनी मेसर्स रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असल्यामुळे त्यांनी मूळ कंपनीच्या क्षमतेचा गैरवापर करून आर्थिक पात्रता पूर्ण केल्या. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात आली तेव्हा रिलायन्स एनयू बीईएसएसने घेतलेले सर्व निर्णय हे त्यांची पालक कंपनी रिलायन्स
पॉवरच्या सल्ल्यानुसार घेतल्याचे आढळले, असा खुलासा सोलर एनर्जीने केला आहे.