अदानी शेअर प्रकरणात सेबीची हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस; हिंडनबर्गच्या प्रतिप्रश्नांत कोटक महिंद्राचेही नाव

अदानी समूहाच्या शेअर व्यवहारांविषयी स्पह्टक अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेला सेबीने अदानी समूहाविरुद्ध 2023 मध्ये कथित ‘अयोग्य व्यापार पद्धतीं’चा अवलंब केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना ‘गप्प बसवण्याचा आणि धमकावण्याचा’ हा प्रयत्न म्हणजे एक बकवास कृती असल्याचे प्रत्युत्तर हिंडेनबर्गने दिले असून सेबीला याप्रकरणी चार प्रश्न विचारले आहेत.

26 जूनला सेबीनेही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अदानी समूहाबद्दल जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या खोडसाळ अहवालात हिंडेनबर्गने काही तपशिलाचे हेतूत चुकीचे सादरीकरण आणि सनसनाटीकरण केल्याचा आरोप सेबीने ठेवला आहे.   अदानी समूहाने विदेशात बोगस कंपन्यांचे विस्तृत जाळे तयार करून अब्जावधी डॉलर्स ‘गुप्तपणे’ अदानी समूहातील सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांमध्ये आणि बाहेर हलवल्याच्या अहवालातील पुराव्यांवर तपासाचा रोख केंद्रित न केल्याबद्दल सेबीवर टीका केली आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांचा आणि संलग्न बातम्यांचा वारंवार इन्कार केला आहे.

कोटक महिंद्राने सहभाग नाकारला

कोटक महिंद्रा इंटरनॅशनल लिमिटेड (KMIL) च्या प्रवक्त्याने हिंडनबर्ग त्यांच्या कंपनीचे ग्राहक असल्याचा आज इन्कार केला. त्यांच्या कोणत्याही गुंतवणूकदाराचा हिंडनबर्ग भागीदार होता हे कंपनीच्या फंडाला कधीच माहिती नव्हते, असे प्रवक्त्याने आज एका निवेदनात म्हटले आहे.

हिंडेनबर्गने सेबीला विचारले प्रतिप्रश्न

आमचा अहवाल येण्याआधी सेबीच्या अध्यक्षा बुच यांनी 2022 मध्ये गौतम अदानी यांची दोनवेळा का भेट घेतली होती?

अदानी समुहाच्या शेअर व्यवहारात कोटक महिंद्राचा उपयोग झाला असूनही सेबीने उदय कोटक यांचे नाव उघड का केलेले नाही?

हिंडनबर्गने अदानी शेअर व्यवहारात केवळ 4.1 दशलक्ष डॉलर कमावले असताना सेबीने हिंडनबर्गने शेकडो दशलक्ष डॉलरचा नफा कमावल्याच्या खोटय़ा बातम्या का दिल्या?

हिंडनबर्गच्या निष्कर्षांना दुजोरा देणाऱ्या 40 हून अधिक बातम्यांबाबत सेबीने मौन का धारण केले आहे ?