माधवी बुच यांच्यावर काँग्रेसचे नवे आरोप, ‘अगोरा’च्या माध्यमातून केली 2 कोटी 95 लाखांची कमाई

सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी काही कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली असून ‘अगोरा’च्या माध्यमातून त्यांनी 2 कोटी 95 लाख रुपये कमावले, तसेच महिंद्रा अँड महिंद्राकडून माधवी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांना 2019 ते 21 या कालावधीत 4 कोटी 78 लाख रुपये मिळाले, अशी आरोपांची नवी फैर आज काँग्रेसने झाडली.

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने काही दिवसांपूर्वीच अदानी समूह, माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावरही आरोप केले होते. यानंतर काँग्रेसनेही माधवी बुच यांच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आज काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी हे नवीन आरोप पत्रकार परिषदेत केले, मात्र हे आरोप महिंद्रा समूहाने फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे माहिती होते का, तुमच्या ‘आयबी’ने तुम्हाला काही रिपोर्ट दिले नव्हते का? तुम्ही अद्यापही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रश्न खेरा यांनी विचारले आहेत.

 गंभीर आरोप

माधवी बुच या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असताना त्यांनी ही कमाई केली. त्यामुळे हे नियमांचे उल्लंघन आहे. या काळात सेबीने महिंद्रा अँड महिंद्राच्या बाजूने अनेक आदेशही जारी केले होते, असा गंभीर आरोप पवन खेरा यांनी केला.