पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकांकडून बारकाईने तस्करांवर वॉच ठेवला जात आहे. मेफेड्रॉनसह विविध अमली पदार्थांच्या विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पथकांनी प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने मेफेड्रॉन विक्रेत्यासह पुरवठादारांची साखळी तोडण्यासाठी नव्याने उजळणी घेण्यात आली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्याकडून मेफेड्रॉन विक्रीचा कोट्यवधींचा धंदा पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे तस्करांचे कंबरडे मोडले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर छुप्या पद्धतीने मेफेड्रॉनसह, गांजा विक्री करीत असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थविरोधी पथकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. येरवड्यात विक्रीसाठी आणलेले तब्बल 22 लाखांचे 110 ग्रॅम मेफेड्रॉन गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी दोनने नुकतेच जप्त केले आहे. त्यानंतर लगेचच अमली पदार्थ विरोधी पथक एकने कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर दोघा तस्करांना पकडून 15 लाख 70 हजारांचे मेफेड्रॉन जप्त केले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसह, आयटी नोकरदार तरुण- तरुणींना अमली पदार्थांच्या खाईत लोटून नशेली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची कुंडली तयार करण्यात आली आहे. परराज्यासह परदेशातून अमली पदार्थ आणून हजारो रुपयांत विक्रीचे रॅकेट तस्करांकडून चालविले जात आहे. त्या पार्श्वभूमवीर गुन्हे शाखेकडून फक्त मेफेड्रॉन (एमडी) गांजा, कोकेन तस्करांविरुद्ध कारवाईवर भर दिला आहे. कारवाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तस्करांची पळता भुई थोडी झाली आहे. आगामी काळातही कारवाईचा वेग वाढविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कारवाईची मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, एसीपी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय अनिकेत पोटे यांच्यासह अमली विरोधी पथकांतील कर्मचारी- अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
” पुणे हे विद्येचे माहेरघर असून, शहरात कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही. प्रामुख्याने ड्रग्ज तस्करांविरुद्ध यापूर्वीही मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. जवळपास साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रॉन रॅकेट उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, नशामुक्त पुणे शहर करण्यासाठी आम्ही विशेष प्राधान्य दिले आहे. त्यानुसार अमली पदार्थ तस्करांसह पुरवठादारांची साखळी तोडण्यास प्राधान्य दिले आहे. ड्रग्ज पेडलरविरुद्ध कारवाईचा बडगा कायमस्वरूपी ठेवला जाणार आहे. – अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त
नशामुक्त पुणे शहरासाठी तस्करांची झाडाझडती
■ विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नशामुक्त शहर बनविण्यासाठी पोलिसांनी नव्याने शङ्क ठोकला आहे. ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची एकत्रित माहितीचा धांडोळा घेतला जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकांनी प्रत्येक झोननुसार तस्करांना टारगेट केले आहे. माहितीच्या आधारावर ट्रॅप लावून तस्करांची पाळेमुळे खोदली जात आहेत