
>> राजेश चुरी,मुंबई
मुंबई आणि आसपासच्या भागातील समुद्रकिनारे आणि खाड्यांमध्ये सध्या हजारो किलोमीटरचे अंतर पार करून मोठ्या संख्यने सी गल पक्षी ( Seagulls ) आलेले आहेत. सायबेरिया, मंगोलिया, किरगीस्तान, कझाकिस्तान अशा भागातून प्रचंड अंतर पार करून हिवाळ्याच्या मोसमात हे सी गल्स आपल्या देशात येतात. त्या भागात उणे(मायनस) तीस डिग्री सेल्सिअस तापमान असते. म्हणून हे पक्षी खाद्याच्या शोधात मुंबई आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर भक्ष्याच्या शोधात येतात. पण आपल्याकडे भूतदयेच्या नावाखाली या पक्ष्यांना कुरकुरे, वेफर्स, फरसाण, पाव असे जंक फूड खायला दिले जात आहे. या जंक फूडमुळे नव्या पिढीच्या तब्येतीची आधीच वाट लागत चाललेली आहे.पण सध्या भूतदयेच्या नावाखाली या पक्ष्यांना जंक फूड खायला देऊन या पक्ष्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
मुंबईतून गेट वे ऑफ इंडियाला लाँचमधून जाताना, किंवा पालघर वसईला जाताना लागणाऱ्या वर्सोवा खाडीवर, दादर-माहीम चौपाटीवर या पक्ष्यांना जंक फूड खायला घालण्याचे प्रकार वाढत आहेत या प्रकाराबद्दल पर्यावरण प्रेमी आणि पक्षीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. पण सी गल्सना खायला देणाऱ्यावर कारवाई होताना दिसत नाही.
View this post on Instagram
गेली तीस पस्तीस वर्षे पक्ष्यांचा अभ्यास करणारे मुंबईतील पक्षी तज्ज्ञ आदेश शिवकर यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या सी गल्सना फरसाण, पाव खायला देऊन नैसर्गिक अन्नसाखळीत बदल होत आहे. लडाखपासून मध्य आशियाई देशातून हे सी गल्स मुंबईच्या परिसरात येतात. यात प्रामुख्याने ब्लँड हेडेड सी गल्स, ब्राऊन हेडेड सी गल्स, स्लेंडर बिल्ड या जातींचा समावेश आहे. मध्य आशियाई भागातील देशात तापमान उणे तीस डिग्री सेल्सिअस असते त्यामुळे भक्ष्याच्या शोधात हे पक्षी आपल्याकडे येतात. समुद्रातील मासे, किनारपट्टीवर मेलेले मासे हे त्यांचे प्रामुख्याने खाद्य आहे. पण भूतदयेच्या नावाखाली आपण त्यांना जंक फूड देऊन त्यांना मृत्युच्या खाईत नेत आहोत. वास्तविक या पक्ष्यांना समुद्रात मुबलक खाद्य उपलब्ध असते. पण आपण त्यांना फरसाण, गाठिया देऊन त्यांच्या अन्नसारखीत बदल घडवत आहोते. या पक्ष्यांनाही या खाण्याच्या चटक लागते. त्यामुळे ते जंक फूड खातात आणि त्यांनाही त्याची सवय लागते. आपल्याला वाटते हेच त्यांचे खाद्य आहे. पण जंक फूडमुळे त्यांच्या अंडी निर्मितीवरही फरक पडतो. त्यामुळे या पक्ष्यांना कृपा करून जंक फूड खायला देऊ नका असे आवाहन आदेश शिवकर करतात. मोठी माणसं या पक्ष्यांना खायला जंक फूड देतात आणि लहान मुले त्यांचे अनुकरण करतात. पण आपण नव्या पिढीला चुकीच्या मार्गाकडे नेत असल्याची खंतही ते व्यक्त करतात.
स्थानिक भाषेत केगाई
मुंबई आणि आसपासच्या भागात हजारोंच्या संख्येने हे पक्षी येतात. पण त्यांच्या संख्येचा फारसा अभ्यास झालेला नाही. कोळीबांधव त्यांना स्थानिक भाषेत केगाई म्हणून ओळखतात. समुद्रात मासेमारी करताना हे पक्षी मच्छिमारी बोटीच्या आसपासच उडत असतात अशी माहितीही आदेश शिवकर यांनी दिली.