मालवण पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. आपटे याला त्याच्या कल्याण येथील घरातून बुधवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. पुतळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आपटे फरार होता. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होते.

आपटे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात पथके स्थापन केली होती. ही पथके आपटेचा कसून शोध घेत होती. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी रात्री आपटेविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. आपटेने भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांनी ही नोटीस जारी केली. अखेर आपटेला बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आले आहे.

जयदीप आपटेचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने 29 ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्याच्या पत्नीला शहापूर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अपटेचा संभाव्य ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीकडून त्याच्या मालवण आणि कोकण परिसरातील नातेवाईकांचे पत्तेही घेतले होते.