लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये ‘छावा’चे स्क्रीनिंग बंद; प्रेक्षक संतापले; शिवसेनेच्या दणक्यानंतर थिएटर व्यवस्थापन ताळय़ावर

शिवजयंतीचे औचित्य साधून लोअर परळ येथील पीव्हीआर थिएटरमध्ये ‘छावा’ चित्रपट बघायला गेलेल्या प्रेक्षकांचा बुधवारी हिरमोड झाला. स्क्रीन बंद असल्याने प्रेक्षक चांगलेच संतापले, मात्र थिएटरच्या व्यवस्थापकांनी तिकिटाचे पैसे परत करण्यास नकार दिला. शिवसेनेच्या दणक्यानंतर थिएटर व्यवस्थापन ताळय़ावर आले असून पुढील आठवड्यातील कोणत्याही एका शोचे मोफत तिकीट आणि तिकिटाच्या चारपट पैसे प्रेक्षकांना देण्याचे आश्वासन दिल्याने प्रेक्षकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल याची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. शिवजयंतीला सार्वजनिक सुट्टीमुळे अनेकांनी सहकुटुंब हा चित्रपट बघण्याचे प्लॅन आखले होते. पीव्हीआर थिएटरमध्ये बुधवारी सकाळी 8 च्या शोवेळी स्क्रीनवर कधी साऊंड गायब व्हायचा, तर कधी ब्लॅक स्क्रीन यायची. ऐनवेळी शो रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. संतापलेल्या प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे करण्याची मागणी केली. परंतु तांत्रिक कारण देत थिएटर व्यवस्थापनानी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पाच तास गोंधळ उडाला.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे थेट पीव्हीआरमध्ये पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी थिएटरच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर पीव्हीआर व्यवस्थापन नरमले आणि पुढील आठवड्यात एका शोचे मोफत तिकीट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शाखाप्रमुख गोपाळ खाडये, दीपक बागवे उपस्थित होते.

‘छावा’ टॅक्स फ्री करता येणार नाही – मुख्यमंत्री

‘छावा’ हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत असली तरी हा चित्रपट टॅक्स फ्री करता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. इतर राज्यांत जेव्हा एखादा चित्रपट टॅक्स फ्री केला जातो तेव्हा ते करमणूक कर माफ करतात, पण महाराष्ट्रात 2017 पासून करमणूक करच नाही. हा करच अस्तित्वात नाही. त्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री करता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. संभाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रचारासाठी आणखी काय करता येईल यावर सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.