विज्ञान – रंजन – ‘क्षीर’सागर!

दृष्टिभ्रमाचे किती विविध प्रकार असतात ना? साधे जत्रेतले ते अंतर्गोल आणि बहिर्गोल आरसे आठवा. आपलीच प्रतिमा कृश किंवा लठ्ठ करण्याची ‘जादू’ हे आरसे करतात आणि गंमत आणतात. हातचलाखी किंवा नजरबंदीचे ‘जादू’चे प्रयोग असेच असतात. याशिवाय पत्त्यांपासून ‘रोप ट्रीक’पर्यंतच्या अनेक ‘जादू’ जगात प्रचलित आहेत. परंतु सर्वात मोठा, विराट जादूगार कोणी असेल तर तो सर्वव्यापी निसर्ग. त्याच्या नियमांपलीकडे या विश्वात काहीच घडत नाही. मग ते नियम आपल्याला ठाऊक असोत पिंवा नसोत. त्यातल्या इंद्रधनुष्याच्या विभ्रमामागचे कोडे उलगडले असले, रंग उधळणारे ध्रुवीय ‘अरोरा’ कशामुळे घडतात हेसुद्धा समजते तरी त्याबद्दलचे कुतूहल संपत नाही आणि ते तसेच राहायला हवे. कुतूहल आणि जिज्ञासा संपली की, माणूस स्थितीवादी होतो नि गतीबरोबरच प्रगतीही खुंटते. हे सगळे खरे असले तरी एखाद्या गोष्टीचे इंगित पिंवा कार्यकारणभाव माहीत झाला तरी उत्सुकता कमी होत नाही. स्प्रिंगवर गरगरणाऱ्या मेणाच्या तबकडीतून ‘आवाज’ प्रकटतो तो कसा हे काही अज्ञात नाही, पण आमच्याकडच्या ‘शतायुषी’ पह्नवर रेकॉर्ड वाजते याचे कुतूहल वाटतच राहते.

अशाच कुतूहल जागवणाऱ्या नैसर्गिक विभ्रमातून ‘मृगजळ’ दिसते. किती सार्थ वर्णन आहे, ‘मिराज’चं. का दिसते हे मृगजळ? ते उन्हाळय़ातच का दिसते? सोपे उत्तर असे की, तीव्र उन्हाने धरती, पाणी तापते तसेच हवाही गरम होतेच. अशा वेळी वातावरणातील हवेच्या तप्त थरांमधली घनता एकसारखी नसते. त्यामुळे त्या विविध थरांतून प्रकाशाचे होणारे विकिरणही सारखे नसते. त्यातून रस्त्यावर दूर कुठेतरी ‘पाणी’ असल्याचा विभ्रम तयार होतो असे तुम्हीही कधी अनुभवलेले असेल. आपल्याला त्यामागचे विज्ञान समजू शकते, पण प्राण्यांना ते कसे कळावे. त्यांची फसगत होते आणि तहानलेले प्राणी पाण्याच्या शोधात धावत सुटतात. त्यामध्ये हरणांचा वेग सर्वाधिक म्हणून त्यांची तृषार्त धाव अधिक असते. हरीण म्हणजे मृग आणि हरणाला चकवा देणारे पाणी ते मृगजळ.

अनेकदा हिमालयात उंच शिखरावर जाताना ऑक्सिजन (प्राणवायू) कमी पडल्याने अनेकांना इकडच्या वस्तू पिंवा माणसे दुसरीकडे ‘उडत’ गेल्यासारखे भासते. असे ‘चमत्कार’ निसर्ग अनेकदा करतो.

त्यातलाच एक ‘क्षीर’सागर! क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. ही संकल्पना आपल्या प्राचीन कथानकांमधूनही येते. याचा अर्थ कोणीतरी त्या काळातही ‘क्षीर’सागर ‘पाहिला’ असेलच. तसेच मृगजळ किंवा कमी ऑक्सिजन मिळाल्याने होणारे दृष्टिविभ्रमही अनुभवले असतील. अशा अनेक ‘चमत्कारां’मागचे विज्ञान कालांतराने समजले. राहू-केतू हे चंद्र-पृथ्वी कक्षांमधल्या 5 अंशाच्या कोनामुळे होणारे छेदनबिंदू ‘नोडस्’ आहेत याची कल्पना आपल्या महाराष्ट्रातील भास्काराचार्यांना बाराव्या शतकातच आली होती. परंतु ‘यद्पि शुद्धं, लोकविरुद्धं ना करणीमय’ तसेच ‘ना कथनीयम्’सुद्धा असेल. कारण त्या-त्या काळाच्या म्हणून काही मर्यादा असतात. नवा भविष्यवेधी विचार समाजात रुजवायला वेळच लागतो. त्यामुळे संशोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचायला बराच काळ उलटतो. गॅलिलिओ यांच्या बाबतीत असेच घडले.

आजच्या काळात पुढच्या टेक्नोसॅव्ही पिढ्य़ा मात्र या सगळय़ा गोष्टींमागचे कुतूहल शमवण्यासाठी तयार असतात असा आमचा अनुभव आहे. चिकाटीने आणि सौम्य ठामपणाने अशा गोष्टी व्यक्त कराव्या लागतात. ‘क्षीरसागर’ कल्पनेची नुसती खिल्ली उडवून चालत नाही. त्यामागचे विज्ञान सांगितले तर ते लोकांना पटते.

या ‘दूधसागरा’च्या दृष्टिभ्रमात सुमारे 6 ते 16 हजार चौरस किलोमीटरचा जलसाठा शुभ्र रंगाचा दिसतो. त्याला बायोल्युमिनेसेन्स आणि फॉस्पहरिसेन्स कारणीभूत असतात. सागरी पाण्यातील अतिसूक्ष्म जिवाणू पाण्याचा रंग ‘बदलतात.’ 1985 मध्ये एका बोटीने क्षीरसागरातील पाणी आणले. ते अर्थातच ‘क्षीर’ म्हणजे दूध नव्हते. व्हायब्रिण्ड हार्वे नावाच्या बॅक्टेरियाचे अस्तित्व मात्र पाण्याच्या पृथक्करणानंतर आढळले. असे क्षीरजल मुख्यत्वे नॉक्टिल्यूस सायण्टिलेन्स पिंवा साध्या भाषेत ‘सी स्पार्कल’मुळे दिसू लागते.

1915 ते 1993 या काळात अनेक दर्यावर्दींनी 235 ठिकाणी ‘क्षीरसागरा’ची अनुभूती मिळवली. 2015 मध्ये आपल्याकडे केरळमधील अलेप्पी येथील सागरात ‘क्षीरसागर’ परिणाम (मॅरिल इफेक्ट) दिसला होता. ओशनोग्राफी संस्थेने त्याचा अभ्यास केल्यावर तो ‘नॉक्टिल्यूका’ इफेक्ट असल्याचे म्हटले. मात्र अशा विविध सूक्ष्म जलजिवाणूंमुळे समुद्राचे, तलावांचे, सरोवरांचे पाणी कधी लाल, हिरवेसुद्धा दिसते. आपले ‘लोणार’ सरोवर ‘लाल’ झाल्याचे वृत्त आणि फोटोही आलेच होते. एरवी समुद्र ‘नीलसागर’ दिसतो. तोसुद्धा प्रकाशकिरणांच्या विकरणाचा परिणाम असतो. नील-किरणांचं विकिरण सर्वाधिक होते. म्हणूनच निरभ्र आकाशही निळे दिसते.

नेहमीप्रमाणे यातला क्लिष्ट वाटणारा तांत्रिक भाग वगळला तरी काव्यात्म भाव तसाच राहतो. मग ते मृगजळ असो क्षीरसागर असो, की फेसाळ, दुधाळ कोसळणारा गोवा रेल्वे मार्गावरच्या पॅसलरॉक येथील ‘दूधसागर’ नावाचाच धबधबा. तो तरी जरूर पाहा. त्यामागचे असे विज्ञान समजले तर जाणिवाही प्रगल्भ, शुभ्र होतील!

विनायक