पैठण येथे 155 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या निजामकालीन शाळेत शिक्षण घेतलेल्या 39 विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला होता. ही शाळा आजही जिल्हा परिषदे मार्फत चालू असून तत्कालीन स्वातंत्र्यसैनिक विद्यार्थ्यांची नावे असलेला फलक व्हरांड्यात लावण्यात आला आहे. यात हुतात्मा भाऊराव कानडे व पैठणचे भूमिपुत्र शंकरराव चव्हाण यांचेही नाव आहे ! पैठण शहरात असलेली शाळेची इमारत आजही भक्कम स्थितीत आहे, हे विशेष । 1869 साली या शाळेची स्थापना करण्यात आली. निजामी सत्ताकाळात पैठण तालुक्यातील ही एकमेव शाळा होती. हुतात्मा भाऊराव कानडे, पैठणचे भुमिपुत्र शंकरराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष दिगंबर कावसानकर, त्र्यंवकदास पटेल, तात्यासाहेब महाजन, इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील व प्राचार्य भगवंत देशमुख हे याच शाळेत शिकले. अन् मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. ब्रिटिश आमदनीतील सशस्त्र क्रांतीकारक अनंत कान्हेकर यांचे सहकारी प्रभाकर काशिनाथ भोगले हे 1909 साली पैठणच्या याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या असहकार आंदोलनात या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठवाडा
मुक्तीनंतर 1953 साली पहिली शालांत परीक्षा झाली. विद्यार्थी स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा फलक या ऐतिहासिक शाळेच्या अंतर्गत छोटे उद्यान उभारण्यात आले असून, त्याला ‘भूमीपुत्र शंकरराव चव्हाण उद्यान’ हे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच शाळेत शिक्षण घेतलेल्या व स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या खालील विद्यार्थ्यांची नावे देण्यात आली आहेत. भाऊराव कानडे, शंकरराव भाऊराव चव्हाण, त्र्यंबकदास दामोधरदास पटेल, काशीनाथ गणपतराव बोंबले, यशवंत शाहूराब कोलते, गोनाजी भाऊराव खोचे, विठ्ठल रंगनाथ बावकर, नरहर मनोहर देव, राधाबाई रंगनाथ पोहेकर, देविदासराव मुधलवाडकर, काशीनाथराव कुलकर्णी, हरिभाऊ कवनानकर, केशव विष्णुपन कुलकर्णी, दिगंबर नारायणराव कुलकर्णी, कोशल्याबाई कुलकर्णी, विठ्ठल दामोधर देशपांडे, बाळासाहेब पाटील, पांडुरंग गोसावी, नारायणबुवा दत्तात्रययुवा गोसावी, विष्णुपंत रामचंद्र जोशी, बामन पंडीतराव महाजन, तात्यासाहेब महाजन, मदनलाल मोतीलाल लोहिया, बद्रीनारायण रामनारायण लोहिया, गुलाबचंद बालचंद नागोरी, संपलाल गुलाबचंद नानोरी, रमणीकलाल देविदास पटेल, सय्यद सुलेमान, विठ्ठल माणिकराव सोनारे, सीताराम सोनाजीराव लेंभे, गंगाराम भानुदास चौथमल, सुमेरसींह मोतीसिंह परदेशी उर्फ करकोटक, यशवंत सिताराम सातघरे, भगवान एकनाथ कानडे, बळीराम गोविंदसिंह मिरदे, रामचंद्र व्यंकटेश कोरने, रामचंद्र पंडरीनाथ कडेठाणकर, दिनकर लक्ष्मण भंडारी व केशरीनाथ गोपाळ महाजन आदी.