
दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई कॉलेजमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राचार्य प्रत्युष वत्सला आणि इतर कर्मचारी शाळेच्या भिंतींना शेणाने सारवत आहेत. भिंतींना सारवण्याचे काम अद्याप सुरूच आहे. एक आठवडय़ानंतर याचा निकाल समोर येईल. पोर्टा केबिनमध्ये संशोधन केले जात असून नैसर्गिक माती आणि विशेषतः गायीच्या शेणामुळे भिंतीचे कोणतेही नुकसान होत नाही. याउलट वर्गांमध्ये गारवा राहतो, असे प्राचार्य वत्सला यांनी सांगितले. संशोधन म्हणून भिंती शेणाने सारवल्या जात आहेत. जेणेकरून सर्व वर्गांमध्ये गारवा राहील. स्वदेशी आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे हा आमचा हेतू आहे, असेही त्या म्हणाल्या. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वत्सला त्यांच्या कर्मचाऱ्यांसह भिंती सारवत आहेत. वर्गातील वातावरण सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या खोल्यांमध्ये लवकरच एक नवीन अनुभव येईल. त्यांचा शिकण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवण्यासाठी आम्ही हा उपक्रम करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काहीही अफवा पसरवू नका
दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमधील व्हिडीओ समोर येताच अनेकांनी सरकारला लक्ष्य केले. मात्र प्राचार्यांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन करताना काही लोक पूर्ण माहिती शिवाय काहीही पसरवत आहेत असे त्यांनी सांगितले. केवळ एक प्रयोग म्हणून शाळेच्या भिंती शेणाने सारवल्या जात आहेत. माती आणि शेण यांसारख्या नैसर्गिक गोष्टींनी काहीही नुकसान होत नाही, असे वत्सला यांनी नमूद केले.
n प्राचार्यांनी स्वतः हा व्हिडीओ कॉलेजच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर केला असल्याची माहिती आहे. त्यांनी सी ब्लॉकमधील वर्ग खोल्या थंड ठेवण्यासाठी स्वदेशी पद्धतीचा वापर केला. प्राचार्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दाखला देत टीका केली. तर काहींनी त्यांच्या कृतीला दाद दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात आलेल्या या कॉलेजची स्थापना 1965 मध्ये झालेय. वर्गाच्या खोल्या शेणाने सारवल्यामुळे अशोक विहार येथील कॉलेज चर्चेत आले आहे.