मैदानाच्या दुरवस्थेमुळे शालेय क्रीडा स्पर्धा रद्द, डोंबिवली क्रीडा संकुलात मातीचे ढीग, दारूच्या बाटल्यांचा खच; शिवसेनेने धरले केडीएमसी अधिकाऱ्यांना धारेवर

केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे डोंबिवलीतील एकमेव सावळाराम महाराज क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. मैदानात दारूच्या बाटल्या, काचा विखुरल्या आहेत. माती आणि ग्रीटचे ढीग असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजपासून आयोजित केलेली शालेय क्रीडा स्पर्धा रद्द करावी लागली. मुलांचा हिरमोड झाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी आज पालिका मुख्यालयावर धडक देत मैदानी खेळासाठी की दारू पार्ट्यांसाठी असा अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 9 ते 11 जानेवारीदरम्यान क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. यात अ‍ॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी आणि धावण्याच्या स्पर्धांचा समावेश होता. 6 नोव्हेंबर रोजी क्रीडा संकुल बुक करण्यात आले होते. अडीच हजार स्पर्धकांची नोंदणी झाली होती. आज सकाळी कल्याण जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे, उपजिल्हाप्रमुख तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, युवासेना जिल्हाधिकारी प्रतीक पाटील, अरविंद बिरमोळे, शहरप्रमुख अभिजित सावंत, सुधाकर वायकोळे, प्रदीप हाटे, परेश काळण, प्रशांत कारखानीस, मंगेश मोरे, संजय मांजरेकर, सुरेश सावंत, मंगेश सरमळकर, जयेश म्हात्रे, सुदर्शन जोशी, पंकज कोटकर, वरूण चौहान आदी उपस्थित होते.