
गल्ली ते दिल्लीपर्यंत कबड्डीला वशिलेबाजीची कीड लागलीय. अत्यंत दिमाखात सुरू झालेल्या राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनीय दिवशीच ठाणेकर कबड्डीप्रेमींनी कबड्डीतील वशिलेबाजी चव्हाटय़ावर आणताना संघनिवडीत मनमानी करणाऱ्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केला. या मागणीमुळे राज्य कबड्डीत खेळाडूंवर होत असलेला अन्याय पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली होत असलेल्या या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत यजमान पुरुष संघाकडून दमदार सुरुवात अपेक्षित होती. पण साखळी लढतीतील लातूरविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोठय़ा विजयाची अपेक्षा असताना ठाणे जिह्याच्या संघाला 32-35 असा अनपेक्षित पराभवाचा धक्का सहन करावा. हा धक्का इतका जबर होता की, हा पराभव पाहून ठाणेकरांचा राग अनावर झाला आणि त्यांनी संघनिवडीत मनमानी आणि हस्तक्षेप करणाऱ्या अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करून स्पर्धेतच जोरदार ‘चढाई’ केली.
जानेवारी महिन्यात झालेल्या पुरुष ‘अ’ गटाच्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता 20 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यात विजेत्या ग्रिफिन संघाचे चार, उपविजेत्या ओम वर्तक क्रीडा मंडळाचे तीन, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या विठ्ठल क्रीडा मंडळाचे तीन, आत्माराम क्रीडा मंडळाचे दोन आणि उपांत्य पूर्व फेरीत गारद झालेल्या कृष्णा पाटील यांच्या आनंद स्मृती क्रीडा मंडळाच्या एका खेळाडूचा समावेश होता, मात्र अंतिम 12 खेळाडूंचा संघ निवडताना उपविजेत्या संघाचा फक्त एक आणि पाटील यांच्या संघाचाही एक खेळाडू निवडण्यात आला.
संघात निवडलेले काही खेळाडू केवळ पाटील यांनीच मनमानी चालवत निवडल्याचे समोर आले. संघनिवडीत वशिलेबाजीचा आरोप करत ओम साई क्रीडा मंडळाच्या आकाश पालकर, रोहन चिनकाटे यांनी स्पर्धेतून माघार घेतली. मग विठ्ठल क्रीडा मंडळाच्या चिन्मय गुरव आणि अक्षय मकवाना या खेळाडूंनीही त्यांना पाठिंबा दिला. खेळाडूंच्या नाराजीनंतरही संघटनेच्या अध्यक्षांनी आपण स्पर्धा घेतोय तर माझ्या संघातील खेळाडू ठाणे जिह्याच्या संघात का नको, असे सांगत संघात बदल करण्यास नकार दिला.
कबड्डीतील अन्यायाला संघटनाच जबाबदार
कबड्डीत आपल्या संघातील खेळाडूंवर अन्याय झाला की कबड्डी संघटक आणि कबड्डीपटूंचे प्रेम अचानक जागृत होते आणि तेच वशीलेबाजीची बोंब सुरू करतात. मुळात या साऱ्या प्रकाराला संघटना आणि संघटकच सर्वस्वी जबाबदार असल्याचे दिसलेय. कबड्डीचे संघ निवडताना आजवर गुणवान खेळाडूंची निवड न करताना अंतिम फेरीत किंवा उपांत्य फेरीत खेळलेल्या संघातील खेळाडूंनाच प्राधान्य दिले जाते. ही पद्धत अत्यंत चूकीची असतानाही सर्वांनी ती मान्य केली आहे. साखळीत बाद होणाऱ्या संघातही धोनीसारखी गुणवत्ता असलेले असंख्य खेळाडू असू शकतात, याची साधी जाणीवही कबड्डी संघटकांना अद्याप झालेली नाही.
जो खेळाडू प्रत्यक्षात चांगला खेळतो, चांगल्या पकडी करतो, चांगल्या चढाया करतो, अशा खेळाडूंची संघात निवड करणे गरजेचे असताना केवळ अंतिम चार संघातील खेळाडूंची निवड वर्षेनुवर्षे केली जातेय. विशेष म्हणजे निवड झालेल्या आणि न निवड झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीची आकडेवारी संघटनेनी कधी तयारच केलेली नाही. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कबड्डीत खेळाडूंचे गुण कसे मोजतात, याचे साधे प्रशिक्षणही गुणलेखकांना देण्याची बुद्धी राज्य असो किंवा जिल्हा संघटनांना आजवर सुचलेली नाही. कबड्डीत खेळाडूंचे खरे गुण मोजले गेले की संघटनांची वशीलेबाजी उघडकीस येईल अशी सर्वांच्या मनात भीती आहे. त्यामुळे कबड्डीत एक प्रो कबड्डीवगळता कोणत्याही स्पर्धेत खेळाडूंचे न कागदावर गुण नोंदवले जातात, ना त्यांच्या कामगिरीची कुणी नोंद करत नाही, हे प्रत्येक स्पर्धेत दिसते. संघटनेकडून खेळाडूंच्या निवडीसाठी निवड समितीत दिग्गज खेळाडूंची वर्णी लावली जात असली तरी निवड केलेल्या खेळाडूंच्या कामगिरीची कुणाकडेही नोंद नसते. त्यांचे सारेकाही हवेत आणि अंदाजपंचे असते. त्यामुळे जोपर्यंत कबड्डीत मनमानी कारभार करणारे संघटक आणि कामचुकार गुणलेखक आहेत तोपर्यंत कबड्डीत वशीलेबाजी रोखणारा कुणी ‘माई का लाल’ जन्माला येऊच शकत नाही, हे कटू सत्य आहे.