कारवाईची भीती दाखवून ठगाने महिलेकडून 78 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिलेला एका नंबरवरून फोन आला. त्याने तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नोटिफिकेशन विभागातून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या विरोधात कोर्टाची अटक ऑर्डर आली आहे. तुमच्या नावाच्या आधारकार्डचा गैरवापर केला आहे. तुम्ही बँकेला काही पैसे देणे आहे. त्यामुळे तुमचा फोन बंगळुरू पोलिसांना देतो असे त्याने भासवले. ठगाने महिलेला पोलीस असल्याचे भासवले. ठगाने महिलेला एक फॉरमॅट पाठवला. ज्या वरिष्ठ अधिकाऱयाशी बोलणार आहेत त्या तापट स्वभावाच्या आहेत. ते जे सांगतील ते शांतपणे ऐकून घ्या, अशी ठगाने भीती दाखवून महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. भीतीपोटी महिलेने 78 लाख रुपये भरले. महिलेने याची माहिती त्यांच्या मुलाला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.