रायगडच्या पाणीपुरवठा विभागात सवा कोटींचा घोटाळा, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडेचा कारनामा

रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सवा कोटींचा घपला झाल्याचे समोर आले आहे. या विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने हा कारनामा केला असून कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फरकाची रक्कम थेट स्वतःच्या व बायकोच्या खात्यात वळती केली आहे. इन्कम टॅक्स पडताळणी करताना कोरडेचा हा भंडाफोड झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.

पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो. पगार व पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत. याच बाबीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने गैरफायदा घेतला. नाना कोरडे याने कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून मागील वर्षभरात सुमारे 1 कोटी 19 लाख रुपये ढापले आहेत. ही बाब इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करताना जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सदर समितीने केलेल्या चौकशीत नाना कोरडे याने आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची धनादेशांवर बनावट सही करून पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वळती केली. तसेच काही रक्कम पत्नी सोनाली कोरडे हिच्या खात्यात वळती केल्याचे निदर्शनास आले आहे.

अहवाल येताच होणार गुन्हा दाखल

नाना कोरडे हा पाणीपुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी महिला व बालविकास विभागाच्या अलिबाग व म्हसळा प्रकल्प येथे 2020 पासून कार्यरत होता. या ठिकाणीही त्याने असाच गैरव्यवहार केला आहे का, याची तपासणी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. येथेही त्याने अशाच प्रकारचा गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरडे याने गैरव्यवहार केलेल्या रकमेपैकी सुमारे 68 लाख रुपयांची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाच्या हवाली केली आहे.