नव्या नंबरप्लेटच्या नावाने चोरटे ठरताहेत ‘नंबर वन’, अधिकृत संकेतस्थळावरूनच करा प्रक्रिया

2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आल्यानंतर ३० मार्चपूर्वी ती बसवावी लागणार आहे. पुण्यात सुमारे २५ लाख वाहनांना ही प्रक्रिया करावी लागणार आहे. ही बाब हेरून आता सायबर चोरटेदेखील सक्रिय झाले आहेत. चोरट्यांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी ऑनलाइन काही बनावट साईट तयार केल्या असून या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रक्रिया करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना 1 एप्रिल 2019 पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांनादेखील परिवहन विभागाने एचएसआरपी बंधनकारक केले आहे. त्यानुसार 30 मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावून घ्यावी लागणार आहे.

त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यात रोझमार्टा ही एजन्सी काम करीत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या एजन्सीकडून 69 फिटमेंट सेंटरला परवानगी देण्यात आली असून वाहनधारकांनी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना या सेंटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष नंबरप्लेट बसवून दिली जाणार आहे. दरम्यान, शहरात नंबरप्लेट बसविण्यासाठी असलेल्या केंद्राची संख्या अपुरी आहे. यात वाढ करावी, अशी मागणी वाहतूक संघटनेचे एकनाथ ढोले यांनी केली आहे.

“फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावी. या संकेतस्थळावरून प्रक्रिया केल्यानंतर नागरिकांना सर्व माहिती मिळू शकेल.

– स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.