एसटीमध्ये धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेत गोलमाल, ठाण्यातील गुरुकृपा हॉस्पिटलवर ‘कृपा’ कोणाची? आर्थिक संकटातील महामंडळावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा बोजा

ST-bus-Logo

शिंदे सरकारच्या काळात एसटी महामंडळामध्ये लागू केलेल्या धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेत कोटय़वधी रुपयांचा गोलमाल झाल्याचे उघडकीस आले आहे. एसटी कामगारांची मागणी नसताना शिंदे सरकारने ही योजना लागू केली व त्याअंतर्गत वैद्यकीय चाचण्या ठाण्याच्या गुरुकृपा हॉस्पिटलमधून करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. त्याचा एसटी महामंडळावर कोटय़वधी रुपयांचा बोजा पडला आहे. त्यामुळे ‘गुरुकृपा’वर कृपा करणारा ‘आका’ कोण? याची सखोल चौकशी करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

एसटी महामंडळामधील 25 पैकी कोणत्याही संघटनेने मागणी केली नसताना शिंदे सरकारने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेची घोषणा केली. वास्तविक कामगार संघटनांनी कॅशलेस सुविधेची मागणी केली होती, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्याचे संकेत दिले होते. असे असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोफत योजनेऐवजी धर्मवीर आनंद दिघे योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून एसटी महामंडळावर कोटय़वधी रुपयांचा अतिरिक्त बोझा टाकला गेल्याने एसटी कर्मचारी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. 22 नोव्हेंबर 2023 रोजी योजनेचा ठराव करून प्रति कर्मचारी 3 हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. योजनेची घोषणा सरकारने केली, मात्र योजनेच्या खर्चाचा भार आर्थिक संकटातील एसटी महामंडळाच्या माथी मारल्याने शिंदे सरकारचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, या ‘गोलमाल’बाबत एसटी महामंडळातील मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

उपलब्ध माहितीनुसार, एसटीच्या कोल्हापूर विभागाने अकरा वैद्यकीय चाचण्या मोफत करून घेतल्या. मात्र सांगली विभागाने 67 लाख, चंद्रपूर विभागाने 12 लाख तसेच नांदेड, रत्नागिरी येथे लाखोंचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. लेखी सूचना नसताना रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांनी गुरुकृपा हॉस्पिटलकडून तपासणी करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकरिता तसे परिपत्रक जारी केले. त्यांना या परिपत्रकाबाबत आदेश कोणी दिला, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

तत्कालीन शिंदे सरकारने धर्मवीर आनंद दिघे योजना लागू केल्यानंतर एसटी महामंडळाने आरोग्य तपासणीसाठी सर्व विभागांना आदेश दिले. त्या आदेशात ठाण्यातील गुरुकृपा हॉस्पिटलचे नाव कुठेही नव्हते. असे असताना हे आदेश कुणी दिले हा खरा प्रश्न आहे.

z धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना फेब्रुवारी 2024मध्ये आणली आणि विभागांनी गुरुकृपा हॉस्पिटलला आरोग्य तपासणीचे कोटय़वधी रुपये दिले. त्यानंतर वर्षभराने जानेवारी 2025मध्ये उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी या योजनेसाठी शासकीय दवाखाने, धर्मादाय हॉस्पिटल, सामाजिक संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि शेवटी निविदा हे पर्याय ठेवले.