होय, ईडीमध्ये ‘कुछ गडबड है!’, सुप्रीम कोर्टात केंद्राचे वकील ‘खरे’ बोलले

आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणांतील ईडीच्या कागदोपत्री पुराव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वेच्च न्यायालयात शुक्रवारी ईडीच्या ‘कागदोपत्री घोळा’चा पर्दाफाश झाला. ईडीच्या अधिकाऱयांनी आवश्यक मंजुरी न घेताच प्रतिज्ञापत्र सादर केले. याची न्यायालयाने गंभीर दखल घेताच केंद्र सरकार तोंडघशी पडले. ‘होय, ईडीमध्ये कुछ गडबड है’, असे केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱया अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी मान्य केले.

छत्तीसगढ मद्य घोटाळ्याशी संबंधित आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणातील आरोपीने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान

यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र ईडीने सादर केले. त्या प्रतिज्ञापत्रातील ‘फेरफार’वर न्यायालयाने बोट ठेवताच ईडी अधिकाऱयांच्या ’गोलमाल’ कारभाराची सर्वांदेखत पोलखोल झाली. न्यायालयाने ईडीच्या अधिकाऱयांना आणि केंद्र सरकारला धारेवर धरले. अखेर तपास यंत्रणेची पाठराखण न करता केंद्राचे प्रतिनिधी असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी कागदोपत्री घोळ घालण्याच्या ईडीच्या कारभाराची कबुली दिली. ईडीच्या अधिकाऱयांनी वरिष्ठ पातळीवरील आवश्यक मंजुरी न घेताच घाईघाईने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असे विधान एएसजी राजू यांनी केले.

ईडी अधिकाऱयांची खातेनिहाय चौकशी

ईडीच्या ‘कागदोपत्री अफरातफरी’वर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी चिंता व्यक्त केली. मी व्यक्तिश: या प्रकरणातील जबाबदार ईडी अधिकाऱयांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणेच्या संचालकांना आदेश दिला आहे. ईडीमध्ये काहीतरी गडबड आहे. अशा प्रकारच्या गोष्टी तपास यंत्रणेमध्ये घडताच कामा नये, असे विधान एएसजी राजू यांनी केले.

मोदी सरकारला कोर्टाने धारेवर धरले

सकाळच्या सत्रातील सुनावणीवेळी ईडीचा ’प्रतिज्ञापत्र घोळ’ उघड झाला. त्यावर मोदी सरकारतर्फे बाजू मांडताना एएसजी राजू यांनी ईडीमध्ये काहीतरी गडबड असल्याची कबुली दिली. त्याची नोंद घेत न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱया ईडीच्या वकिलांना हजर राहण्याचे आदेश दिले. ईडीच्या अधिकाऱयांनी दिलेले प्रतिज्ञापत्र ’ऑन रेकॉर्ड’ वकिलांनी वाचले पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले. त्यावर एएसजी राजू यांनी संबंधित वकिलाला दोषी न धरण्याची विनंती केली. त्यांच्या या द्विधा भूमिकेवर न्यायालय संतापले. तुम्ही ’ऑन रेकॉर्ड’ वकिलांना वाचवण्याचा प्रयत्न करताय का, असा संतप्त सवाल न्यायालयाने करताच एएसजी राजू यांनी दिलगिरी व्यक्त केली.