महागाईने होरपळणाऱ्या जनतेला SBIचा दणका; गृहकर्ज महागलं, EMIमध्ये होणार वाढ

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्टेट बँक ऑफ इंडियाने दणका दिला आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नव्हता. मात्र बँकांनी व्याजदरांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. SBI ने देखील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्जदारांना अधिक EMI भरावा लागणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 जूनपासून सर्व टेन्यूरसाठी एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंटची अर्थात 0.1 टक्क्यांची वाढ केली आहे. SBI च्या या निर्णयामुळे एमसीएलआरशी संबंधित सर्व कर्जधारकांचा हप्ता वाढणार आहे. याचाच अर्थ पुढील महिन्यापासून कर्जधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे.

SBI च्या निर्णयामुळे एक वर्षाचा एमसीएलआर 8.65 टक्क्यांवरून वाढून 8.75 टक्के झाला आहे. तर ओव्हरनाईट एमसीएलआर 8.00 टक्क्यांवरून वाढून 8.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. यासह एक महिना आणि तीन महिन्यांचा एमसीएलआर 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांवर गेला आहे. तर सहा महिन्यांचा एमसीएलआर 8.55 टक्क्यांवरून 8.65 टक्के, दोन वर्षांचा एमसीएलआर 8.75 टक्क्यांवरून 8.85 टक्के आणि तीन वर्षांचा एमसीएलआर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, गृहकर्ज आणि गाड्यांसाठीचे बहुतांश कर्ज हे एकवर्षाच्या एमसीएलआरशी संबंधित असतात. त्यामुळे एनसीएलआरशी संबंधित नसणाऱ्या कर्जधारकांवर याचा प्रभाव पडणार नाही. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.