सायरा बानो आणि दिलीप कुमार 1966 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यावेळी दिलीप कुमार यांचं वय 44 होतं आणि सायरा बानो 22 वर्षांच्या होत्या. लग्नाच्या 16 वर्षानंतरही त्यांना मूलबाळ झालं नाही. त्यानंतर दिलीप कुमार यांनी कोणालाही न सांगता आस्मा रहमान नावाच्या मुलीशी दुसरं लग्न केलं. मूल होण्याच्या इच्छेने दुसर लग्न केलं, पण तरीही त्यांच्या घरात पाळणा हललाच नाही. त्यांना बाळाचं सुख लाभलं नाही. दिलीप कुमार यांनी लिहिलेल्या ‘वजुद और परचायिन’ या पुस्तकात त्यांनी सायरा यांना आयुष्यभर दुखावल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
दिलीप यांनी वयाच्या 98 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर सायरा बानो या सावली सारख्या त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणात राहिल्या. दिलीप कुमार गेल्यानंतर सायरा या एकाकी पडल्या. मात्र याचदरम्यान सर्व संकटांना सामोरे जात असतानाच सायरा बानो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बऱ्याच सक्रिय झाल्या आहेत. त्या अनेक जुने फोटो आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टी इंन्टाग्रामवर शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी, त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यात शाहरुख खानबद्दल त्यांचं मन मोकळे केलं होतं. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शाहरुखनेच त्यांचं सांत्वन केलं. त्यांची अशी इच्छा आहे की, जर त्यांना पुढच्या आयुष्यात मुलगा झाला तर तो शाहरुखसारखा असावा. सायरा बानो यांना मुलबाळ नसलं तरी, त्या बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला आपला मुलगा मानतात.
सायरा यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “मी पहिल्यांदा शाहरुखला पाहिले तेव्हा मी त्याला पाहताच मला जाणवले की तो लाजाळू आहे आणि पुढे येण्यास घाबरत आहे. मला हेही लक्षात आले की, तो अगदी दिलीप साहेबांसारखा दिसत होता. मी म्हणाले जर मला मुलगा असता तर तोही त्याच्यासारखाच असता.”